शहरात अमली पदार्थाची तस्करी वाढत असल्याचे उघड

बदलापूर औद्योगिक  वसाहतीतील बंद कारखान्यातून तब्बल सात कोटी रुपयांचे द्रवरूप मेफ्रेडॉन जप्त केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाच्या अपर पोलिस आयुक्तांनी नेमलेल्या पथकाने तपासणीदरम्यान २०७ किलो गांजा जप्त केला आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी यासारख्या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अमली पदार्थ विक्रीचे जाळे विणले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असताना बदलापुरातून एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गांजा जप्त झाल्याने शहरात अमली पदार्थाची तस्करी वाढल्याचे दिसून येत आहे.

कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळातील अवैध आणि अनैतिक धंद्यावर कारवाई करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी विशेष पथकाची नेमणूक केली होती. त्या पथकातील प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बदलापूर पश्चिमेतील  बस स्थानकावर सापळा रचला होता. बदलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर, दीपक जाधव यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी पोलिसांनी नरेश अहिरे या तरुणाला ३० हजार रुपये किमतीच्या २ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांज्यासह अटक केली. बदलापूर जवळील ढोके दापिवली येथील राजाराम कडू यांच्या फार्म हाऊ समध्ये अधिक गांजा असल्याची माहिती त्याने चौकशीदरम्यान दिली. त्यानुसार छापा टाकला असता तेथे हा २०७ किलो ६०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या फार्महाऊ सजवळ उभ्या असलेल्या दोन आलिशान गाडय़ांतूनही गांजा जप्त करण्यात आला. या गाडय़ाही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी नरेशसह कुणाल कडू, सन्नी परदेशी आणि अमोल घनघाव यांना अटक केली आहे. तर फार्महाऊस मालक राजाराम कडू हा फरारी झाला आहे. यातील वाहनांच्या मालकांचा शोध सुरू असून अटक आरोपी अन्य कोणत्या प्रकरणात सामील होते का याचाही तपास सुरू असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली आहे.

आलिशान गाडय़ांचा वापर

गांजाची खरेदी विक्री करण्यासाठी ही टोळी आलिशान गाडय़ांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. गाडय़ांमध्ये दोन किलो वजनाच्या पाकिटांमधून गांजा सापडला आहे. आलिशान गाडय़ा असल्याने त्याची चौकशी सहसा केली जात नव्हती. त्यामुळे आरोपींना संशयाच्या नजरेतून पाहिले जात नसे. त्याचा ते फायदा घेत होते.

 

फरार आरोपी इतर दोन गुन्ह्यंमध्येही

बदलापूरजवळील ढोके दापिवली येथील राजाराम कडू याच्या फार्महाऊसमध्ये हा गांजा सापडला. कडू याच्यावर यापूर्वीही अमली पदार्थ कायद्यान्वये अंबरनाथ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणात विशिष्ट टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे.

अमली पदार्थविरोधी कारवाई

  • अंबरनाथमधील सिद्धार्थनगर येथून सुमारे ४ हजार रुपये किमतीचा ४३८ ग्रॅम गांजा जप्त
  • विठ्ठलवाडी स्थानकातून तीन लाख रुपये किमतीचा ३ किलो ३०० ग्रॅम गांजा जप्त
  • उल्हासनगरमधील भाल गाव येथून ८२ किलो वजनाचा गांजा जप्त.
  • बदलापूर उड्डाणपुलाखालून ८ किलो १४४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त
  • बदलापूर एमआयडीसी परिसरातून ७५ लिटर द्रवरूप मेफ्रेडॉन जप्त. अंदाजे किंमत सात कोटी रुपये.