23 October 2020

News Flash

२०९ गावे करोनामुक्त

२८ दिवसांत एकाही नव्या रुग्णाची नोंद न झाल्याने दिलासा

करोनामुक्त झालेल्या गावांमध्ये हिरवा झेंडा फडकवण्यात येत आहे.

२८ दिवसांत एकाही नव्या रुग्णाची नोंद न झाल्याने दिलासा

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागात करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना ग्रामीण परिसरातील २०९ गावे मात्र करोनामुक्त झाल्याची दिलासादायक बातमी पुढे आली आहे. ग्रामीण भागातील साथ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रमांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. ठाणे ग्रामीणमधील २०९ गावांमध्ये २८ दिवसांत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे या गावांमध्ये करोनामुक्तीचा हिरवा झेंडा फडकविण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या ग्रामीण तालुक्यांमध्ये एप्रिल महिन्यापासून करोनाचा संसर्ग पसरला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये या भागात राहाणाऱ्या १३ हजार ८२१ नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये ग्रामीण भागात करोना संसर्गाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची वाणवा असलेल्या या भागांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली .

करोनामुक्त गावांमध्ये हिरवा झेंडा

ग्रामीण भागातील गावांमध्ये २८ दिवस एकही नवा करोना रुग्ण आढळला नाही तर त्या गावामध्ये जिल्हा परिषदतर्फे हिरवा झेंडा लावला जातो. ग्रामीण भागातील २०९ गावांमध्ये अशा प्रकारचा हिरवा झेंडा लावण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेमार्फत सर्वेक्षण

’ रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणांना तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून तिथे १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येते.

’  या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशासेविका, शिक्षक यांची १ हजार २८ पथके तयार करण्यात आली आहेत.

’ ठाणे ग्रामीणमधील १ हजार ९२० प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये या पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.

’ आतापर्यंत ग्रामीण भागातील १ हजार ४२२ प्रतिबंधित क्षेत्रांतील १ लाख ४ हजार ४२६ घरांमध्ये राहणाऱ्या ४ लाख ५९ हजार ७५ नागरिकांचे १४ दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

’ २५०हून अधिक गावांपैकी २०९ गावांमध्ये गेल्या २८ दिवसांपासून एकही नवा करोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या गावांना करोनामुक्त म्हणून घोषित करण्यात आले.

ग्रामीण भागातील उर्वरित गावांमधील ४२८ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आली.

 

मुरबाड तालुक्यात कमी रुग्ण

ग्रामीण भागात १३ हजार ८२१ जणांना आतापर्यंत करोनाची लागण झाली. त्यापैकी ११ हजार १३५ रुग्ण करोनामुक्त झाले असून ३९८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या केवळ २ हजार २८८ रुग्ण उपचार घेत आहेत. या सक्रिय रुग्णांमध्ये भिवंडी ग्रामीणमधील ७९५, शहापूर तालुक्यातील ५९१, कल्याण ग्रामीणमधील ५२३, अंबरनाथ तालुक्यातील २२० तर मुरबाड तालुक्यातील केवळ १५९ रुग्णांचा समावेश आहे.

ठाणे शहरात ३२ टक्के कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण

महापालिका क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ माझे कुटुंब, माझी जबाबदारी‘ ही मोहीम प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत शहरातील एकूण ३२ टक्के कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.  शिक्षक आणि महापालिका कर्मचाऱ्याच्या मदतीने ही मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी एकूण ५०० पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत शहरातील प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये आतापर्यंत शहरातील ३२.०१ टक्के म्हणजेच १ लाख ४० हजार ९३६ कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात सुमारे ४ लाख २३ हजार ५९८ नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2020 3:08 am

Web Title: 209 villages in thane district recovered from coronavirus zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 रुग्णांच्या नातेवाईकांची त्रासातून मुक्तता
2 बदलापूरजवळ बिबटय़ाचा वावर?
3 मेट्रोसाठी शेकडो पथदिव्यांवर हातोडा
Just Now!
X