उकडलेली चण्याची डाळ, गूळ आणि वेलची, जायफळ, सुंठ टाकून बनणारी पुरणपोळी हा महाराष्ट्राचा उत्सवी खाद्यपदार्थ. होळीपासून रक्षाबंधनापर्यंत आणि गुढीपाडव्यापासून दिवाळीपर्यंत कोणत्या न कोणत्या उत्सवात हमखास केल्या जाणाऱ्या पुरणपोळीचं हे पारंपरिक गोड स्वरूप आता बदलत आहे. डोंबिवलीतील एका तरुणाने आंबा, चिकू, स्ट्रॉबेरी, सीताफळ अशा एक नव्हे तर २१ वेगवेगळय़ा चवींतील पुरणपोळय़ा बनवून विकण्याचा व्यवसाय सुरू केला असून, त्यात तिखट पुरणपोळीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, हा विस्तार पुरणपोळीच्या चवीपुरताच मर्यादित न ठेवता या तरुणाने ‘पुरणपोळी डॉट कॉम’ नावाचं संकेतस्थळ काढून त्याद्वारे जगभर ही पुरणपोळी पोहोचवण्याची संकल्पना आखली आहे.
डोंबिवलीतील सौरभ किशोर दहिवतकर या तरुणाने हा व्यवसाय सुरू केला असून सध्या डोंबिवली, ठाकुर्ली परिसरात प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून कल्याण, ठाणे, मुंबई परिसरात आणि त्यानंतर देशासह, परदेशात सेवा देण्याचा विचार करण्यात येणार आहे. येत्या आठवडय़ात ‘पुरणपोळी डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे शुभारंभ करून नवउद्यमाचा अभिनव व्यवसाय सुरू होणार आहे.
नेरळमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करणाऱ्या सौरभचे मन त्याला अन्य व्यवसायाकडे आकर्षित करत होते. ज्ञाती समाजाच्या एका कार्यक्रमात भोजन घेत असताना त्याला पुरणपोळीची संकेतस्थळावरून विक्री करण्याची कल्पना सुचली. या विचाराला व्यावसायिक असलेले वडील किशोर व काका अजय दहिवतकर यांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर सौरभने हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अन्न व औषध, नोंदणी विभागाच्या परवानग्या घेतल्या. त्यानंतर आता हे विक्री केंद्र सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
संकेतस्थळावरून ग्राहकाने पुरणपोळीची मागणी केली की त्यांना नोंदणीप्रमाणे एक दिवसात गरम पुरणपोळी उपलब्ध करून देण्यात येईल. सुरुवातीला डोंबिवली, ठाकुर्ली भागात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्राहकाने पुरणपोळी केंद्रात येऊन खाण्याची मागणी केली तर, तीही सुविधा उपलब्ध असणार आहे. पुरणपोळीच्या फ्लेव्हर्सप्रमाणे डेझर्टसाठी उकडीचे मोदक ग्राहकाला देण्यात येतील. भ्रमणध्वणीवर संपर्क करून पुरणपोळीची मागणी केली, तर थेट घरपोच सुविधाही देण्यात येणार आहे. ग्राहकाने ऑनलाइन पद्धतीने पैसे भरणा करून ही सुविधा देता येईल का, यादृष्टीने काही बँकांबरोबर बोलणी सुरू आहेत, असे सौरभने सांगितले.

कोणते असतील फ्लेव्हर्स?
मँगो, बदाम, पिस्ता, चिकू, सीताफळ, स्ट्रॉबेरी, चीज चॉकलेट, ब्लॅक करंट, ब्ल्यू बेरी, वॉटरमेलन, पानमसाला, गुलाब, चॉकलेट, चीज बटर हे फ्लेव्हर्स गोड पुरणपोळीमध्ये उपलब्ध असतील. तिखट पुरणपोळी सेजवान, आचार, चॉप व्हेजिटेबल या प्रकारात उपलब्ध होणार आहे. तिखट पुरणपोळी ही नवीन संकल्पना आहे. या सर्व फ्लेव्हर्सच्या चवी ग्राहकांकडून घेऊन झाल्या आहेत. त्यास चांगला प्रतिसाद आहे. संकेतस्थळ उद्घाटनाच्या दिवशी १७०० ते १८०० पुरणपोळ्या तयार करण्यात येणार आहेत. तीन प्रकारात नऊ इंच व्यासाची ही पुरणपोळी असणार आहे.