वर्षांनुवर्षे नोटीस बजावूनही शाळा बंद करण्यास टाळाटाळ

नवीन शैक्षणिक वर्षांला सुरुवात झाली असतानाच, ठाणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यतील २१ माध्यमिक शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी प्रशासन घेणार नाही, असे स्पष्ट करत जिल्हा परिषद प्रशासनाने या शाळेच्या संस्थाचालकांनाच शाळा बंद करण्याचे आवाहन केले आहे. या शाळा अनधिकृत असल्याचे वर्षांनुवर्षे जाहीर करूनही त्यावर काहीच कारवाई न झाल्याने पालक आपल्या पाल्यांना या शाळांमध्ये पाठवत आहेत. असे असताना आता ऐन शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला या शाळा बंद करण्याची टूम काढण्यात आल्याने येथे शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी जाहीर केलेल्या अनधिकृत माध्यमिक शाळांच्या यादीत इंग्रजी माध्यमाच्या १३ तर मराठी आणि हिंदी माध्यमाच्या प्रत्येकी चार शाळांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यतील अनधिकृत शाळांची माहिती दरवर्षी जाहीर करण्यात येते. मात्र, वेळोवेळी आवाहन करूनही या शाळा सुरूच ठेवण्यात येत असल्याने पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश या शाळांमध्ये घेतात. या शाळांविषयी कठोर भूमिका घेणे आजवर प्रशासनाला जमलेले नाही. उलट यंदाही सालाबादप्रमाणे प्रशासनाने प्रवेशाची जबाबदारी पालकांवर ढकलली आहे.

या शाळांमधील संचालक, सचिव आणि मुख्याध्यापक यांनी संगनमत करून परवानगी नसताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देत दरमहा फी घेतली तसेच अशा प्रकारे विद्यार्थी, पालक यांच्यासह शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत या शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांनी दिले आहेत. अनधिकृत शाळा तात्काळ बंद न केल्यास संबंधित शिक्षण चालकांविरोधात बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमाच्या तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही कळविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात शाळा सुरू होत असताना जिल्हा परिषदेने यासंबंधीच्या नोटिसा बजाविल्याने पालकांमधील संभ्रम वाढला आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू असताना किंवा शाळा सुरू होण्यापूर्वीच त्या बंद करण्याची कारवाई करणे आवश्यक असताना प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर नोटिसा बजावून काय उपयोग असा सवाल आता पालकांमधून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, यासंबंधी संबंधित शिक्षण संस्था चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कायद्यान्वये तरतूद असताना जिल्हा परिषदेने संबंधित शिक्षण संस्था चालकांनी स्वतहून या शाळा बंद कराव्यात आणि जिल्हा परिषदेस कळवावे अशी भूमिका घेतली आहे.

अनधिकृत माध्यमिक शाळांची यादी

आदर्श विद्यालय (इंग्रजी, हिंदी व मराठी), लोढा, निळजे. प्रशिक स्पेशल विद्यालय (मराठी), कल्याण. स्वामी समर्थ हायस्कूल(मराठी), मीरा-भाईंदर. प्रगती विद्यामंदिर (मराठी), अंबरनाथ. नालंदा विद्यालय (हिंदी), कल्याण. आदर्श विद्यालय सेकंडरी (हिंदी), ठाणे. अरुणज्योत विद्यालय, दिवा. पोदार इंटरनॅशनल स्कूल (सीई) उंबर्डे. भारतीय जागरण इंग्रजी सेकंडरी विद्यालय, कोपरखरणे. श्री साईज्योती सेकंडरी विद्यालय, कोपरखरणे. अल मुमिनाह सेकंडरी विद्यालय, बेलापूर. विद्या उत्कर्ष मंडळ इंग्रजी विद्यालय, बेलापूर. ज्ञानदीप सेवा मंडळ इंग्रजी सेकंडरी विद्यालय, करावे. आरकॉम इस्लामिक विद्यालय, ठाणे. रफिक इंग्रजी विद्यालय, ठाणे. स्टार इंग्रजी विद्यालय, ठाणे. होली मारिया कॉन्व्हेंट इंग्रजी विद्यालय, ठाणे. नवभारत इंग्रजी विद्यालय, अंबरनाथ. आतमन अ‍ॅकडमी, ठाणे.