ठाण्यात राष्ट्रवादीतील नाराजीचा दुसरा अंक

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोघा नगरसेवकांना अटक झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी बोटचेपी भूमिका घेतल्याची तक्रार करत पक्षाच्या २२ नगरसेवकांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या ठाण्यातील कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार टाकला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या कबड्डी सामन्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी तटकरे आले होते. या कार्यक्रमाला सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहावे, असा आदेश असूनही, तो धुडकावून लावत नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे यांच्यासह विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण अटकेत आहेत. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांना अटक होताच राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी कमालीची मवाळ भूमिका घेतली आहे, असा आरोप मुल्ला आणि जगदाळे समर्थकांनी केला आहे. या नगरसेवकांची किंवा त्यांच्या कुटुंबांची साधी विचारपूसही पक्षाने केली नाही. त्यामुळे नाराज नगरसेवकांनी सोमवारी येऊर येथे गुप्त बैठक घेऊन पक्ष सोडण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली होती. या नाराजीचा दुसरा अंक मंगळवारी ठाण्यात रंगला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त ठाण्यात कबड्डी स्पर्धा झाल्या. त्यांच्या पारितोषिक वितरणासाठी तटकरे आले होते. या कार्यक्रमाला पक्षातील सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहावे, असे आदेश असूनही २२ नगरसेवक या कार्यक्रमाकडे फिरकलेदेखील नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीची चर्चा सध्या शहरामध्ये सुरू झाली आहे.