पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील शेतामध्ये एका रात्रीत भलामोठा खड्डा पडल्याने गावकऱ्यांची झोप उडाली आहे. हा खड्डा जवळपास २२ फूट इतका खोल आहे. मात्र, हा खड्डा कसा आणि केव्हा पडला याबद्दल कोणालाही माहिती नाही. रहस्यमयरित्या पडलेल्या खड्ड्यामागे परग्रहवासी असल्याची अफवा आता संपूर्ण परिसरात पसरली आहे. या सगळ्याचा गावकऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे परग्रहवासियांच्या यानामुळे हा भलामोठा खड्डा तयार झाल्याचा संशय गावकऱ्यांना आहे. या भागात राहणाऱ्या तुलसी कोथे या महिलेच्या शेतात हा खड्डा पडला आहे. त्यांच्या शेतातील जमीन खचून जवळपास २२ फुटाचा खड्डा तयार झाल आहे. दरम्यान, जमीन खचताना जोरदार आवाज ऐकू आल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, पावसामुळे एखादे झाड पडले असावे असा अंदाज करत सुरूवातीला कोणीही तिकडे फिरकले नाही. त्यानंतर सकाळी याठिकाणी भलामोठा खड्डा पडल्याचे निदर्शनास आले. या खड्ड्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. विक्रमगडमधील शासकीय अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट दिली आहे. भूगर्भ शास्ञज्ञांच्या अहवालानंतरच या गोष्टीची अधिक माहिती मिळणार आहे.

alien