१५८ पैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध; पाच ग्रामपंचायतींचा निवडणुकीवर बहिष्कार

ठाणे : जिल्ह्य़ातील १५८ ग्रामपंचायतींच्या एकूण १ हजार ४७२ जागांसाठी ४ हजार ३८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननी प्रक्रियेत १८३ अर्ज बाद झाले तर, १ हजार ५४६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तसेच आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर ठाणे तालुक्यातील १८ गावांच्या पाच ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे १४३ ग्रामपंचायतीच्या ९९४ जागांसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी २ हजार २३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या निवडणुकांची आता रणधुमाळी सुरू झाली आहे.

ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यातील ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली होती. मात्र, करोनाचा काळात निवडणुका होतील की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. असे असतानाच राज्य निवडणूक आयोगाने या तालुक्यातील १५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १५ जानेवारीला निवडणुकांसाठी मतदान होणार आहे तर १८ जानेवारीला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती.

जिल्ह्य़ातील १५८ ग्रामपंचायतींच्या एकूण १ हजार ४७२ जागा आहेत. या जागांसाठी ४ हजार ३८८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत १८३ अर्ज बाद झाले तर, १ हजार ५४६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. याशिवाय, उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये भिवंडी तालुक्यातील वळ, अंबरनाथमधील गोरेगाव, कल्याण तालुक्यातील वरप आणि मुरबाडमधील मासले, आगाशी, कळंबखांडे, डेहनोली, शेलारी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तसेच ४१८ जागांवरही बिनविरोध सदस्य निवड झाली आहे.

ठाणे तालुक्यातील दहिसर, पिपरी, नागाव, वाकळण आणि नारिवली या पाच ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे १४३ ग्रामपंचायतीच्या ९९४ जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत २ हजार २३१ उमेदवार आपले नशीब आजमवीत आहेत. भिवंडी तालुक्यात सर्वाधिक २०५ प्रभाग असून त्या ठिकाणी एक हजार ६३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. इतर तालुक्यांच्या तुलनेत येथेच सर्वाधिक उमेदवार आहेत.

जिल्ह्य़ातील मतदार

१४३               ग्रामपंचायतींमध्ये मतदान

३,०४,९६२      मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

१,६०,४८०      पुरुष मतदार

१,४४,४८०      महिला मतदार

२                   इतर मतदार