14 December 2019

News Flash

लग्नाची खरेदी करुन परतताना खड्ड्यांमुळे अपघात; तरुणीचा ट्रकखाली चिरडल्याने मृत्यू

रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

पावसाळा संपल्यानंतरही रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम असून भिवंडीमध्ये याच खड्ड्यांमुळे एका तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पेशाने डॉक्टर असणारी ही तरुणी लग्नाच्या खरेदीसाठी जात असतानाच काळाने तिच्यावर घाला घातला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरुन खाली पडलेल्या या तरुणीला मागू येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार २३ वर्षीय डॉ. नेहा शेख ही तरुणी तिच्या भावाबरोबर बुधावारी रात्री ११ च्या सुमारास वाडा-भिवंडी रोडवरुन घरी जात होती. दुचाकीवरुन दुर्गाडी परिसरातून रात्रीच्या अंधारामधून जाताना रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीचे चाक रस्त्यामधील खड्ड्यात अडकले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे दुचाकीवर भावाच्या मागे बसलेली नेहा रस्त्यावर पडली. त्याच वेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने तिला चिरडले. या अपघातात नेहाचा जागीच मृत्यू झाला. नेहाच्या भावाला काय झाले हे समजण्याआधीच नेहाचा मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

पुढील महिन्यामध्ये नेहाचे लग्न असल्याने ती खरेदीसाठी भावाबरोबर ठाण्याला गेली होती. लग्नाची खरेदी करुन परत येतानाच हा अपघात झाला. या अपघातामुळे शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्या घरामधून नेहाची वरात निघणार होती त्याच घरातून नेहाची अंतयात्रा काढण्याची वेळ शेख कुटुंबावर आली. या अपघातामध्ये नेहाचा मृत्यू झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांनी या घटनेनंतर काही काळ येथील टोलनाका बंद पाडला होता. भिवंडी परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमळे रोज दुचाकीस्वारांचे अपघात होत असताना प्रशासन रस्ता डागडुजी करण्यासंदर्भात काहीच उपाययोजना करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

First Published on October 10, 2019 2:04 pm

Web Title: 23 year old doctor died due to potholes scsg 91 2
Just Now!
X