करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव रद्द; उर्वरीत ठिकाणी छोटे मंडप

ठाणे : करोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती आणि महापालिकेने उत्सवाबाबत केलेली कडक नियमावली यामुळे यंदा गणेशोत्सवातून अनेक मंडळांनी माघार घेतली आहे. ठाणे शहरातील ३५० पैकी २३०हून अधिक मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून उर्वरीत मंडळांनीही उत्सव मंडपाचा आकार कमी केला आहे. ठाण्यातील अनेक मंडळे रस्ते, पदपथ अडवून त्यावर गणेशोत्सवाचे मंडप उभे करतात. याचा पादचारी, वाहनचालकांना त्रास होतो. मात्र, यंदा या त्रासातून नागरिकांची सुटका होणार आहे.

ठाणे शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरु झाली असून त्यासाठी शहरातील रस्ते आणि पदपथ अडवून त्यावर मंडपांची उभारणी केली जात होती. या मंडपांमुळे शहरातील वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. हे चित्र पाचपखाडी, चंदनवाडी, काजुवाडी, वागळे इस्टेट, किसननगर, कळवा, लोकमान्यनगर, घोडबंदर येथील खेवरा सर्कल, मानपाडा अशा भागातील रस्त्यांवर असायचे. या मंडपांच्या आकारसंदर्भात महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमावली तयार केली होती. मात्र, तरीही अनेक मंडळे जास्त आकारांचे मंडप उभारून रस्ता अडवणूकीचे प्रकार सुरुच असल्याची बाब पालिकेच्या कारवाईतून पुढे आली होती. गणेश विसर्जन आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल-ताशा आणि डिजेचा वापर करून ध्वनी प्रदुषण केले जात होते. मात्र, करोनाच्या निमित्ताने का होईना अशा उन्मादी परंपरेला चाप बसल्याचे चित्र आहे.

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सार्वजनिक उत्सव मंडळांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यात गणेश मुर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीसाठी तीन पेक्षा जास्त नागरिक नसावेत आणि त्याचबरोबर चार फुट उंचीच्या मुर्तीसह १२ फुट उंचीचा मंडप उभारण्याच्या सुचना केल्या आहेत. या सुचनेनुसार शहरातील ३५० पैकी केवळ ११६ मंडळांनी उत्सवाच्या मंडपासाठी पालिकेकडे परवानगी मागितली आहे. यापैकी अनेक मंडळांनी मंडपांचा आकार कमी करण्याबरोबरच उत्सवाचे दिवसही कमी करून साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. तर २३४ मंडळांनी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शहरातील रस्ते अडविण्यात आघाडीवर असलेल्या पाचपखाडी भागातील गणेशोत्सवाचा समावेश असून यामुळे या भागातील रस्ता मोकळा राहणार आहे. तर घोडबंदर खेवरा सर्कलजवळील रस्ता अडविणाऱ्या मंडळाने यंदा मंडपाचा आकार कमी केला आहे.

रस्त्यांना मोकळा श्वास

ठाण्यातील पाचपाखाडी गणेशोत्सव रद्द झाला आहे तर वर्तकनगर, शिवाईनगर, चंदनवाडी, किसननगर, वागळे इस्टेट, माजीवडा, खेवरा सर्कल, कळवा खारेगाव मार्ग, पातलीपाडा या भागातील मंडळांनी मंडपांचा आकार कमी केला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे सर्वच रस्ते मोकळा श्वास घेणार असून यामुळे येथील वाहतूकही सुरळीतपणे सुरु राहणार असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवांमधील सात्विकतापणा हरवला होता. उत्सवाला उन्माद आणि बिभित्स स्वरुप प्राप्त झाले होते. तसेच पर्यावरणपुरक उत्सवांना पर्यावरण दुषितपणा आला होता. परंतु, यंदा करोनाच्या निमित्ताने का होईना पुर्वी सारखाच सात्विकपणे उत्सव साजरा करण्याचा पायंडा पडत असून यापुढेही हाच पायंडा कायम ठेवणे गरजेचे आहे. अशा उत्सवामुळे ध्वनी, वायु आणि जल प्रदुषण कमी होण्यास मदत होणार असून त्याचबरोबर रस्ते आणि पदपथ मोकळे राहणार असल्याने रहदारीला त्रास होणार नाही. 

महेश बेडेकर

ठाणे महापालिका आणि पोलिस प्रशासन करोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामु़ळे पोलीस आणि पालिका प्रशासनाचे काम वाढू नये यासाठी मंडळांनी रस्त्यावर मंडप उभारण्याचे यंदा टाळले आहे. तसेच अनेक मंडळाच्या स्वत:च्या वास्तु असून या वास्तुमध्येच मंडळे गणेश मुर्तीची स्थापना करणार आहेत.

– समीर सावंत, अध्यक्ष – गणेशोत्सव समन्वय समिती, ठाणे जिल्हा