२३४ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध; ३४० दशलक्ष घनमीटरची नवी पातळी गाठण्याकडे लक्ष

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाण्याने जुनी पातळी ओलांडली आहे. जुन्या पातळीनुसार हे धरण १०२ टक्के भरले असून सध्या या धरणात २३४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. यंदा या धरणाची उंची वाढवण्यात आली असून नव्या पातळीनुसार या धरणात ३४० दशलक्ष घनमीटर जलसाठा होऊ शकतो. त्यामुळे हे धरण नवीन पातळी कधी गाठणार, याकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र औद्य्ोगिक विकास महामंडळाच्या मालकीच्या असलेल्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षांत पावसाने लवकर दिलेली ओढ आणि बाप्षीभवनामुळे बारवी धरणाचा पाणीसाठा १३ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे जिल्हय़ातील अनेक शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागले. मात्र जून महिन्याच्या अखेरपासूून मुरबाड तालुक्यात आणि बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे चौदा दिवसांतच पाण्याची पातळी ५० टक्क्यांपर्यंत आली होती. तर या महिनाभराच्या काळात झालेल्या संततधार पावसाने जुन्या क्षमतेनुसार १०० टक्के धरण भरले आहे. सध्याची बारवी धरणाची उंची ६८.६० मीटर आहे. या उंचीपर्यंतचा पाणीसाठा सोमवारी सायंकाळी बारवी धरणात झाला. या वेळी काही अंशी पाणी ओसंडून वाहू लागल्याने एमआयडीसीच्या अभियंत्यांनी तातडीने दरवाजे बंद केले. त्यामुळे बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पाणीपुरवठय़ासाठीचा आवश्यक पाणीसाठा जुलै महिन्यातच उपलब्ध झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.

धरणाचे दरवाजे लावल्याने धरणाची उंची आता ६८.६० मीटरहून थेट ७२.६० मीटरवर जाणार आहे. बारवीतील पूर्वीचा पाणीसाठा २३४ दशलक्ष घनमीटर होता. मात्र आता हा पाणीसाठा थेट ३४०.४८ दशलक्ष घनमीटपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षांत बारवीत अतिरिक्त १०६ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे.

अफवांचा बाजार

बारवी धरणाच्या जुन्या क्षमतेनुसार पाणीसाठा झाल्याने आता बारवी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे काही संदेश सोमवारी रात्रीपासून अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि ग्रामीण भागात समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र या अफवा असून अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याची स्पष्टोक्ती एमआयडीसीच्या अभियंत्यांकडून दिली जात होती.