विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; २३६२ जणांवर दंडात्मक कारवाई

ठाणे : टाळेबंदीचे आदेश असतानाही वाहने घेऊन बाहेर पडलेल्या नागरिकांची वाहने ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने जप्त केली.  तर महत्त्वाचे काम असलेल्या मात्र सरकाने खासगी वाहनांसाठी ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ हजार ३६२ वाहन चालकांविरोधात पोलिसांनी प्रत्येकी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी सकाळपासून टाळेबंदी लागू झाल्यानंतर ठाणे पोलिसांकडून शहरांतील मुख्य मार्ग आणि काही महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्यावर नाकाबंदी सुरू करण्यात आली होती. राज्य सरकारने खासगी वाहन चालकांना नियम ठरवून दिलेले आहेत. त्यामध्ये दुचाकीवर फक्त चालकाला आणि तीन तसेच चारचाकी वाहनांमध्ये चालक आणि त्याच्यासोबत दोन प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानंतरही ठाण्यात अनेकजण नियमांचे उल्लंघन करत बाहेर पडत होते. गुरुवारी सकाळी ७ वाजेपासूनच पोलिसांनी या वाहन चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत २३४ वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये १७९ दुचाकी, ४६ तीनचाकी आणि ९ चारचाकी वाहनांचा सामावेश होता.  ठाणे महापालिका क्षेत्रात पोलिसांनी १२८ जणांची वाहने जप्त केली. यासह महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलेल्या परंतु ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या २ हजार ३६२ जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

ठाणेकरांकडून टाळेबंदीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची वाहने आम्ही जप्त केलेली आहे. दोन ते तीन दिवसांनंतर दंड भरून त्यांची वाहने परत दिली जातील. नागरिकांनी या कालावधीत विनाकारण बाहेर पडून नियमांचे उल्लंघन करू नये.

– अमित काळे,

उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा. 

पोलिसांची कारवाई

विभाग                     वाहने जप्त       दंडात्मक  कारवाई

ठाणे                            १२८                       १००९

भिवंडी                          ४४                         ६३९

कल्याण                        २४                         २४७

उल्हासनगर                  ३८                          ४६७

एकूण                            ३४                         २३६२