वसईमध्ये २०१७मध्ये २३५ प्रवाशांचा मृत्यू

रूळ ओलांडू नका, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असले तरी यासंदर्भात अजूनही पुरेशी जनजागृती झालेली नसल्याचे दिसून येत आहे. वसई-विरार परिसरात गेल्या वर्षी विविध रेल्वे अपघातांत २३५ जणांना जीव गमवावा लागला असून २७३ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्वाधिक मृत्यू रूळ ओलांडताना झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

वसई रेल्वे रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैतरणा, विरार, नालासोपारा, वसई रोड, नायगाव, भाईंदर आणि मीरा रोड ही रेल्वे स्थानके येतात. २०१७ मध्ये २३५ प्रवासी विविध अपघातात मृत्युमुखी पडले असून २७३ प्रवाशी जखमी झाले आहेत. मृत प्रवाशांमध्ये २११ पुरुष तर २४ स्त्रिया आहेत, तसेच जखमींमध्ये २१२ पुरुष तर ६१ स्त्रियांचा समावेश आहे.  रेल्वे रूळ ओलांडू नये म्हणून रेल्वेने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. त्यासाठी रुळाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक जाळी बसवण्यात आलेली आहे. याशिवाय भुयारी मार्ग आणि रेल्वे पादचारी पुलांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. मात्र तरीही शॉर्टकट प्रवाशांच्या जिवावर बेतला आहे. प्रवाशांनी रेल्वे पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी केले.

आधीच्या घटना

  • २०१२ ते २०१६ या पाच वर्षांत विविध रेल्वे अपघातांत १३७२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वसई रेल्वे पोलिसांनी सांगितले.