जलद लोकल पकडण्यासाठी डोंबिवलीकडे धाव

प्रवासी संख्येच्या मानाने अपुऱ्या लोकल सेवा मिळत असल्याबद्दल गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हिंसक आंदोलन करून सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या दिवावासीयांच्या आंदोलनाला आता दोन वर्षे होत आली आहेत. मात्र, या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांच्या हालअपेष्टा संपलेल्या नाहीत. दिव्यातील गर्दीवर उपाय म्हणून या स्थानकात जलद गाडय़ांना थांबा देण्यास सुरुवात करण्यात आली असली तरी, या जलद लोकल प्रवाशांनी तुडुंब भरून स्थानकात दाखल होत आहेत. त्यामुळे दिव्यातून डोंबिवलीत जायचे आणि तेथून थेट जलद लोकल पकडायची, हा दिव्यातील प्रवाशांचा दिनक्रम सुरूच आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील गर्दीच्या स्थानकांमध्ये दिवा ओळखले जाते. मध्य रेल्वे प्रशासनाच्या अहवालानुसार दिवा स्थानकातून दररोज साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतात. यापूर्वी दिवा स्थानकात केवळ धिम्या गतीच्या गाडय़ा थांबत होत्या. जलद लोकलला या स्थानकात थांबा नसल्याने जलद लोकल पकडण्यासाठी प्रवासी डोंबिवली स्थानक गाठत असत. दर वर्षी गर्दीचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या डोंबिवली स्थानकावर कोपर आणि दिवा येथील प्रवाशांचा अतिरिक्त भार पडत असल्याचे चित्र आहे. रविवारी दिव्यात जलद लोकलला थांबा मिळाल्यानंतर डोंबिवलीवरील हा भार कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र उलट चित्र दिसू लागल्याने जलद मार्गावर दिव्याला आणूनही उपयोग काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

दिवा स्थानकात जलद गाडी पकडता आली नाही, तर नंतरची गाडी ही एक-दीड तासाच्या अंतराने आहे. त्या गाडीची वाट पाहण्यापेक्षा काही प्रवाशांनी जिवाची पर्वा न बाळगता मंगळवारी धिम्या मार्गावर येणाऱ्या सीएसटी गाडीत उलटय़ा दिशेने चढणे पसंत केले.

कर्जत, कसारा, बदलापूर येथून येणाऱ्या जलद लोकलमध्ये डोंबिवलीकरांनाच शिरता येत नाही. त्यामुळे अनेकदा डोंबिवलीकर अंबरनाथ व कल्याण या जलद गाडय़ांचा पर्याय स्वीकारून त्यामध्ये चढणे पसंत करतात. दिवा स्थानकात जलद गाडय़ांना थांबा मिळाल्याने म्डोंबिवलीवरील भार काही प्रमाणात कमी होईल, असे वाटत असतानाच अनेकांच्या पदरी निराशाच पडली आहे. कर्जत, कसारा, खोपोली, टिटवाळा या जलद गाडय़ा कल्याण-डोंबिवलीमध्येच गच्च भरत असल्याने दिवेकरांना गाडीत आत शिरता येत नाही. ही गर्दी कमी म्हणून की काय ठाण्याला उतरणारे प्रवासी हे अर्धा दरवाजा भरून टाकतात. अशात दिवेकरांनी गाडी पकडायची कशी, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

मुंब्रा-कळवावासीयांचे दुखणे कायम

कल्याण दिशेने येणाऱ्या गाडय़ा या डोंबिवली व दिव्यातच पूर्ण भरल्या जात असल्याने अनेकदा धिम्या गाडीत मुंब्रा व कळवावासीयांना चढता येत नाही. या स्टेशनवरील भार कमी होण्यासाठी दिवा स्थानकातून गाडी सोडण्याची मागणी प्रवासी महासंघाने केली होती. परंतु लांब पल्ल्याच्या गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देण्यात आल्याने ही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही.