25 January 2021

News Flash

ठाण्यात २४ तास ‘सीएनजी’

ठाणे शहरातील विविध भागांमध्ये एकूण दहा सीएनजी पंप असून त्यापैकी एक पंप दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे

ठरावीक पंपांवरील रांगांतून वाहनांची सुटका; वाहतूक कोंडीतूनही दिलासा

ठाणे शहरात ठरावीक वेळेतच सीएनजी पंप सुरू राहात असल्याने शहरातील प्रमुख भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेले सीएनजी पंप २४ तास सुरू  ठेवण्याच्या हालचाली महिनाभरापूर्वी सुरू झाल्या होत्या. या प्रयत्नांना अखेर यश आले असून, शहरातील सर्व सीएनजी पंप बुधवारपासून २४ तास सुरू झाले आहेत. निर्णय होऊनही नौपाडय़ातील तीन पेट्रोप पंप या वर्दळीच्या भागातील सीएनजी पंप २४ तास सुरू ठेवण्यात येत नव्हता. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मंगळवारी या परिसरात आंदोलन केले. त्यानंतर हे दोन पंप बुधवारपासून २४ तास सुरू झाले आहेत. शहरातील वाहतूक कोंडीवर हा उतारा ठरणार आहे.

ठाणे शहरातील विविध भागांमध्ये एकूण दहा सीएनजी पंप असून त्यापैकी एक पंप दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे. गेल्या काही वर्षांत परिवहन विभागाने शहरातील १०० टक्के रिक्षांचे सीएनजीकरण केले आहे. त्यामुळे या नऊ पंपांवर सीएनजी भरण्यासाठी रिक्षांच्या मोठय़ा रांगा लागतात. शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या तीन पेट्रोल पंप आणि खोपट परिसरात रस्त्याला खेटून सीएनजी पंप आहेत. त्यामुळे या पंपाच्या परिसरात सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या रिक्षांच्या लांब रांगा लागलेल्या असतात. या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे या रांगांचा परिणाम शहरातील अंतर्गत वाहतुकीवर होत असल्याचे चित्र वर्षांनुवर्षे कायम होते. हे सीएनजी पंप सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत असल्याने ठरावीक वेळेत या ठिकाणी गॅस भरण्यासाठी रिक्षांची गर्दी होते. याच काळात इतर वाहतुकीचा भार असतो. त्यामुळे राम मारुती मार्ग, वंदना परिसर, हरिनिवास सर्कल अशा भागात वाहतुकीची मोठी कोंडी होत असते.

या पाश्र्वभूमीवर ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी शहरातील सीएनजी पंपचालकांची तसेच महानगर गॅस कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक महिनाभरापूर्वी आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सीएनजी पंपमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १ जानेवारीपासून २४ तास पंप सुरू ठेवण्याचा निर्णय मालकांनी घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी शहरातील सात पंप मालकांनी सुरू केली असून तीन पेट्रोल पंप भागातील दोन सीएनजी पंप मालकांनी या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही सुरू केली नव्हती. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या कायम होती. त्यामुळे भाजप नौपाडा विभाग सरचिटणीस महेश विनेरकर आणि नगरसेवक सुनेश जोशी, कार्यकर्त्यांनी या पंपाच्या परिसरात मंगळवारी आंदोलन केले.

२४ तास पंप सुरू ठेवण्यात येणार नसेल तर पंप दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. अखेर नौपाडा पोलिसांनी आंदोलनकर्ते आणि पंपमालकांची बैठक घेतली आणि त्यानंतर २४ तास पंप सुरू ठेवण्याचा निर्णय पंप मालकाने घेतला. त्यानुसार बुधवारपासून हे दोन्ही पंप २४ तासांसाठी खुले करण्यात आले असून रिक्षाचालकांनी रात्री नऊनंतरची वेळ निवडल्यास इतर वेळेत या भागात होणाऱ्या कोंडीतून मार्ग निघेल, असे आवाहन आता करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2018 2:34 am

Web Title: 24 hours cng in thane cng pump
Next Stories
1 दिव्यात पुन्हा कचऱ्यातून धूर
2 एक दिवसात १७५० ‘डिजी ठाणे’कर!
3 पालिकेचीं कारवाई सुरूच
Just Now!
X