हिंदू नववर्षाची सुरुवात होते ते गुढीपाडव्यापासून. दरवर्षीप्रमाणे यंदाही पाडव्याच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी झाली आहे. दरवर्षी शोभायात्रांबरोबर आकर्षण असते ते उंच उभारल्या जाणाऱ्या गुढीचे. यंदा गुढी पाडव्याच्या निमित्ताने मीरारोड काश्मिरा भागात २५ फुटी भव्य गुढी उभारण्यात आली आहे. ही गुढी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्र ठरली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवली, ठाणे, दादर. गिरगाव अशा मराठी पट्ट्यांमध्ये या शोभायात्र निघणार आहेत. या शोभायात्रांमध्ये वेगवेगळे देखावे केलेले फ्लोट्सचं आकर्षण असतंच. पण त्याचजोडीला नऊवारी नेसलेल्या आणि बाईकवर बसलेल्या महिला तसंच वेगवेगळी ढोलपथकं, लेझिमच्या तालावर थिरकणारा मुलामुलींचा समूह आणि अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा पोषाख करून आलेली लहान मुलं अशी या शोभायात्रांची खास आकर्षणं असतात.

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री मुंबईच्या कितीतरी उपनगरांमध्ये शोभेचे फटाके फोडलं जातात. ते पहायला लहानांसोबत मोठ्यांचीही गर्दी होते. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शोभायात्रेसाठी तयारीही जोरात आणि जोशात सुरू असते. ढोलपथकांच्या सदस्यांची तर विशेष घाई असते. इतके दिवस घेतलेल्या मेहनतीचं चीज होण्याचा, मांगल्यमय असा गुढीपाडव्याच्या सण येणार असतो.

समजून घ्या गुढी पाडव्याचे महत्व
गुढीपाडवा हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला हा दिवस सर्व प्रकारचे वैभव घेऊन आलेला आहे. हिंदू धर्मपंचांगाप्रमाणे आज नवीन वर्षाची सुरूवात होते. त्याचबरोबर, वसंत ऋतूची सुरूवात देखील आज होत असते. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिषीर या सहा ऋतूंपैकी वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणतात. इंग्रजी महिन्यांप्रमाणे जसे एक जानेवारीला कॅलेंडर बदलतात , तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू धर्मातील दिनदर्शिका म्हणजे पंचांग बदलले जाते. या पंचांगाचा विचार नुसता तारखेने न करता खगोलशास्त्राचा विचार आणि अभ्यास करून केला जातो. त्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या पाच अंगांचा विचार केला जातो. त्याचबरोबर, चंद्राचे राशीतील भ्रमण यांचा विचार देखील केला जातो. एकंदरीतच, या पंचांगामध्ये (दिनदर्शिकेमध्ये) खगोलीय घटनांचा विचार करून मांडणी केली जाते अशा या पंचांगाचे पूजन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजे, वर्षाच्या पहिल्या दिवशी केले जाते.