भगवान मंडलिक

मार्चपर्यंत दाखल होणार

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने मार्च अखेपर्यंत उपक्रमाच्या ताफ्यात २५ बसगाडय़ा वाढवण्याचे नियोजन सुरू केले आहे. प्रवाशांना तत्पर सेवा देणे आणि उपक्रमाचा महसूल वाढविणे हा यामागचा उद्देश आहे. उपलब्ध चालक, वाहकांच्याच साहाय्याने या बस चालवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन उपक्रमातील एका वरिष्ठ सूत्राने दिली.

वाढीव बसचे योग्य नियोजन व्हावे यासाठी वार्षिक देखभाल ठेक्याची निविदा प्रक्रिया परिवहन प्रशासनाने पूर्ण केली आहे. पूर्वीच्या १०० आणि जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान अभियानातून आणलेल्या ११८ बस अशा एकूण २१८ बस ‘केडीएमटी’कडे आहेत. १०० बस रॉयल्टीवर चालविण्यास कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याने केडीएमटीने पूर्वीच्या ताफ्यातील पाच बस आणि टाटा मेकच्या २० बस अशा २५ बसगाडय़ा मार्च अखेपर्यंत वापरात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या ११८ बस असल्या तरी फक्त ७० बस रस्त्यावर धावतात. ४८ बस देखभालीअभावी आगारात पडून आहेत.  नवीन बस रस्त्यावर धावल्यास २४ कोटींचा महसूल मिळणार आहे. त्या आधारे आगामी अंदाजपत्रक प्रशासनाने तयार केले आहे. वाहतूक कोंडीने उपक्रमाला दररोज दीड लाख रुपयांचा फटका बसत आहे. यामुळे केडीएमटी महाव्यवस्थापक मारुती खोडके यांनी उपक्रमाच्या खर्चावर २० ते ३० टक्क्यांची मर्यादा आणली आहे.

मार्च अखेपर्यंत वाढीव बस प्रवासी सेवेसाठी बाहेर काढण्याचे नियोजन सुरू आहे. बस रस्त्यावर काढल्यानंतर त्यांची देखभाल दुरुस्ती वेळेत झाली पाहिजे, म्हणून प्रशासनाने वार्षिक देखभाल ठेक्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. देखभालीच्या ठेक्याचे काम पूर्ण झाले की तात्काळ वाढीव बस प्रवासी सेवेसाठी रस्त्यावर येतील.

– संदीप भोसले, आगार व्यवस्थापक