कार्यालयात पोहोचण्यासाठी घाईघाईनेच निघालेल्या २५ वर्षीय धनश्री गोडवेने डोंबिवली स्थानकातून जलद लोकल पकडण्याचा निर्णय घेतला. सकाळी पाऊणेनऊच्या सुमारास स्थानकात दाखल झालेल्या जलद गाडीत चढण्याचा तिने प्रयत्न केला खरा; मात्र गर्दीमुळे ती कशीबशी गाडीच्या दारात चढू शकली. गाडी सुरू झाल्यानंतर ती लोकलमधून बाहेर पाडली आणि खांबाचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी अशाच गर्दीने भावेश नकाते या डोंबिवलीकर तरुणाचा बळी घेतला असताना त्याच गर्दीमुळे धनश्रीला जीव गमवावा लागला.
डोंबिवलीच्या गुप्ते मार्गावरील गावदेवी सोसायटीमध्ये गोडवे कुटुंबीय राहते. या कुटुंबातील धनश्री ही मोठी मुलगी. वाणिज्य शाखेची पदवी मिळवल्यानंतर ती नरिमन पॉइंट येथील खासगी कंपनीत नोकरीस होती.

वडील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला आहेत. त्यांच्यावर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी होती. लहान भाऊ, आईची वडिलांवर असलेली जबाबदारी पाहूनच धनश्रीने नोकरी सुरू केली होती.