वादळामुळे १५ बोटी भरकटल्या; संपर्क होत नसल्याने कुटुंबीय धास्तावले

गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळामुळे समुद्रात भरकटलेल्या मच्छीमार बोटींपैकी अद्याप १५ हून अधिक बोटींचा संपर्क झालेला नाही. तब्बल २५० मच्छीमारांशी संपर्क होत नसल्याचे त्यांचे कुटुंबीय धास्तावले आहेत. इतर बोटी परतत असल्या तरी या बोटींवरील खलाशी बेपत्ता आहेत.

सध्या मासेमारीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे वसई-विरारच्या पट्टय़ातील शेकडो बोटी मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. मात्र गेल्या आठवडय़ात आलेल्या तुफान पाऊस आणि वादळामुळे बोटी भरकटल्या होत्या. त्यांना तात्काळ परत येण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. काही काळ या बोटींचा संपर्क तुटला होता. मात्र या बोटी आता समुद्रातून परतू लागल्या आहेत, परंतु अद्यापही १५हून अधिक बोटी आलेल्या नाहीत. या बोटीवरील २५० मच्छीमारांचा त्यांच्या कुटुंबीयांशी काहीच संपर्क अद्याप झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकदा बोटी समुद्रात गेल्या की त्या आठवडय़ात मासेमारी करून परत येतात. मात्र मागील मंगळवारी गेलेल्या १५ पेक्षा जास्त बोटींशी अद्याप संपर्क झालेला नाही.

लाखो रुपयांचा फटका

मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या एका बोटीला एका फेरीसाठी किमान दीड ते दोन लाखांचा खर्च येतो. एका बोटीत ६० ते ७० हजारांचा बर्फ लागतो, तसेच एका बोटीवर १० ते १५ खलाशी असतात. त्यांना प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये द्यावे लागतात. डिझेलचाही खर्च येतो. वादळामुळे बोटी भरकटल्या आणि त्यांना मासेमारी न करताच किनाऱ्यावर यावे लागले. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. मासेमारी झाली किंवा नाही झाली तरीही बोटीवरील खलाशांना पैसे द्यावेच लागतात. त्यामुळे या वादळाचा बोटींच्या मालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मच्छीमार पोरबंदर किनाऱ्यावर?

जेव्हा वादळ येते, तेव्हा बोटी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर जातात आणि तेथून खुशाली कळवतात. या बेपत्ता बोटी गुजरातच्या किनाऱ्यावर गेल्या असाव्यात, अशी शक्यता वसई मच्छीमार सोसायटीचे संचालक दिलीप माठक यांनी व्यक्त केली. मात्र बोटींची दुर्घटना झाल्याची शक्यता त्यांनी फेटाळली. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या बोटी सुखरूप किनाऱ्यावर परत येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमच्या गावातील इतर बोटी परतल्या, मात्र माझे पती ज्या बोटीवर गेले त्यांच्याशी अद्याप संपर्क झाला नाही. आम्ही सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण अद्याप त्यांची काहीच खबरबात मिळाली नाही.

– संतान सौदिया, पाचूबंदर