ठाणे जिल्ह्यातील महत्वाचं शहर म्हणून ओळख असलेल्या कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीत गुरुवारी करोनाचे २६ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत शहराची एकूण रुग्णसंख्या ही ४७४ वर गेली असून आतापर्यंत ११ जणांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत.

गुरुवारी पॉजिटीव्ह आलेल्या २६ अहवालांपैकी १८ जणं याआधी करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आले होते. तर उर्वरित रुग्ण हे अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. बदलापूर शहरात अनेक व्यक्ती अत्यावश्यक सेवेमध्ये कामाला आहेत, दररोजच्या प्रवासामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आलं आहे. सध्याच्या घडीला २०५ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून, २५८ रुग्ण डिस्चार्ज घेऊन घरी परतले आहेत. अद्याप ६९ रुग्णांचा अहवाल येणं बाकी असल्यामुळे या संख्येत येत्या काही दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.