कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचं सत्र सुरुच आहे. गुरुवारी २६ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरातील एकूण रुग्णांचा आकडा आता ३८० वर पोहचला आहे. आतापर्यंत बदलापुरात ९ रुग्णांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत.

गुरुवारी सापडलेल्या २६ रुग्णांपैकी १८ रुग्ण हे याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. उर्वरित रुग्णांपैकी काही रुग्ण हे अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत प्रवास करणारे असून यामध्ये नगरपरिषदेच्या एका कंत्राटदाराचाही समावेश आहे. बदलापूर शहरात पॉजिटीव्ह आढळणाऱ्या रुग्णांवर ठाणे, उल्हासनगर, डोंबिवली, मुंबई यासारख्या ठिकाणी उपचार केले जात आहेत. आतापर्यंत १७४ लोकं उपचार घेऊन घरी परतले असून १९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अद्याप ४८ जणांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काळात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने शहरातील ७१ रहिवासी संकुलं प्रतिबंधीत केली आहेत.