खर्च अवास्तव असल्यामुळे लेखा परीक्षणाची मागणी

गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि जलप्रदूषण टाळले जावे यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांवर २६ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील पाच प्रभागांमध्ये कृत्रिम तलावांची सोय करून देण्यात आली होती. या सुविधेला कल्याण डोंबिवलीतील भाविकांनी भरभरून प्रतिसादही दिला. एकीकडे या स्वागतार्ह बदलाचे कौतुक होत असताना महापालिकेच्या अभियंता विभागाने एका कृत्रिम तलावासाठी १ लाख ९९ हजार ५३३ रुपये खर्ची घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकूण पाच प्रभागांमधील कृत्रिम तलावांसाठी २५ लाख ९६ हजार २८४ रुपयांचा खर्च करण्यात आला असून ही उधळपट्टी असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.

ठाणे शहराच्या धर्तीवर यंदा कल्याण डोंबिवलीतही गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची आखणी करण्यात आली होती. सांस्कृतिकतेचा टेंभा मिरविणाऱ्या कल्याण डोंबिवलीत असा प्रयोग यापूर्वीच सुरू व्हायला हवा होता. मात्र, पर्यावरणप्रेमींकडून वारंवार मागणी करूनही महापालिकेने हा बदल अंगीकारला नाही. यंदा मात्र महापालिकेच्या एकूण पाच प्रभागांमध्ये १३ कृत्रिम तलाव गणपती विसर्जनासाठी बांधण्यात आले होते. महापालिकेने आखलेल्या या योजनेचे सुरुवातीच्या काळात कौतुकही झाले. असे असताना या कृत्रिम तलावांवर झालेला खर्च वादात येण्याची चिन्हे आहेत. अभियंता विभागाने एका कृत्रिम तलावासाठी १ लाख ९९ हजार ५३३ रुपये खर्च केला आहे. डोंबिवलीत कस्तुरी प्लाझा, न्यू आयरे रोड, प्रगती महाविद्यालय, नेहरू मैदान, पंचायत विहीर, शिवम रुग्णालय, टिळकनगर शाळा, अयोध्यानगरी, भागशाळा मैदान, आनंदनगर, कल्याणमध्ये खडकपाडा भागातील मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, चिंचपाडा, कोळसेवाडी पोलीस ठाणे भागात कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली होती. कृत्रिम तलाव उभारणीची कामे बांधकाम विभागाने मे. आर. एस. पेठेकर एन्टरप्रायजेस, मे. शोभा एन्टरप्रायजेस, केम सव्‍‌र्हिसेस या मजूर कामगार संस्थांना दिली होती. एका माजी पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाने ही कृत्रिम तलावांची कामे घेतली होती, अशी चर्चा आहे. ‘फ’ प्रभागातील कृत्रिम तलावांची कामे कोणत्या ठेकेदाराला दिली होती, याचा पत्ताच अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येते. एकाही ठेकेदाराचे देयक अद्याप वितरित करण्यात आलेले नाही.

शहर स्वच्छ राहिलेच पाहिजे. शहर परिसरातील नैसर्गिक स्रोतांचे प्रदूषण होऊ नये म्हणून पालिका कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देते ती स्वागतार्ह आहे; पण या व्यवस्थेतही काही गडबडी अधिकारी करीत असतील तर पर्यावरणीय संवर्धनाच्या नावाखाली प्रशासनातील गढूळपणा नाहक वाढीला लागतो, तो थांबला पाहिजे.  – अ‍ॅड. शिरीष देशपांडे, डोंबिवली

कृत्रिम तलाव तयार करताना विशिष्ट प्लॅस्टिक, वाळू व इतर घटकांची गरज असते. ही सामग्री थोडी महाग असते. त्यामुळे कृत्रिम तलाव तयार करताना येणारा खर्च वाढतो. यामध्ये कोणत्याही गडबडी नाहीत.  – प्रमोद कुलकर्णी,  शहर अभियंता, कडोंमपा