नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई

गेल्या आठवडय़ात ठाणे शहरात रिक्षाप्रवासादरम्यान एका तरूणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची घटना घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागाने संपूर्ण शहरात रिक्षांची तपासणी मोहीम हाती घेतली. त्यात पाच ते सहा हजार रिक्षांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २६० रिक्षा जप्त करण्यात आल्या. रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी ही मोहीम सुरूच ठेवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे येथील तीन हात नाका भागातून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली. शहरात अशाचप्रकारच्या तीन घटना याआधी घडल्या आहेत. गेल्या आठवडय़ातील या घटनेमुळे महिलांसाठी रिक्षाचा प्रवास सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. या घटनेनंतर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने शहरात रिक्षा तपासणी मोहिम हाती घेतली. ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेसाठी पाच वायूवेग पथके नेमण्यात आलेली आहेत. प्रत्येक पथकात तीन मोटार वाहन निरिक्षकांचा समावेश आहे. या पथकाने आतापर्यंत सुमारे ५ ते ६ हजार रिक्षांची तपासणी केली. दरम्यान, तपासणी मोहिमेत ज्या रिक्षाचालकांकडे बिल्ला व वाहन परवाना नसल्याचे उघड झाले आहे, त्या रिक्षा परवानाधारकांविरोधात मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच या रिक्षाचा परवाना किमान एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आलेला असल्याचेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नोंदणी रद्द झालेली असतानाही रिक्षामधून प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे आढळून आले तर संबंधित चालकांवर गुन्हे नोंदवण्याचा निर्णय  विभागाने घेतला.

  • ३३६ रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले असून, त्यामध्येही चालकाकडे बिल्ला नसणे, गणवेश परिधान न करणे, चालकाशेजारी प्रवासी बसविणे, कागदपत्रे वैध नसणे अशा गुन्ह्य़ांखाली २६० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.