२७ गाव संघर्ष समितीच्या नेत्यांचा दावा; मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवण्याची रणनिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांची नगरपालिका स्थापन करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. नगरपालिकेबाबत शासनाची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांची भेट मिळणे मुश्किल झाल्याचा आरोप करत आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपला अस्मान दाखविण्याची तयारी संघर्ष समितीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. दिवा परिसरातील तीन पॅनलमधील ११ जागांवर समितीचे नेते प्रभाव पाडू शकतील, असा दावा केला जात आहे. याठिकाणी भाजपविरोधी प्रचार करण्याची रणनिती आखली जात आहे.

अतिशय गोपनीयरित्या बैठका घेऊन संघर्ष समितीच्या ठराविक नेत्यांनी भाजपला धडा शिकविण्याच्या हालचाली सुरू  आहेत. या बैठका आणि त्यामधील चर्चेविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. गावांमधील काही जाणकार, ज्येष्ठ मंडळी भाजप नेते, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघडपणे बोलू लागले आहेत. २७ गाव परिसरात ठाणे महापालिका हद्दीतील एकूण २२ गावे आहेत. या गावांमध्ये आगरी, कोळी समाज अधिक संख्येने आहे. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांच्या बैठका घेऊन समाज अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून भाजप शासन कसे दुटप्पी भूमिका घेते, आश्वासने देऊन बोळवण करते असा प्रचार करण्याची तयारी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविण्याचा हा भाग असल्याचे बोलले जाते.

गेल्या वर्षी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांनी या गावांच्या स्वतंत्र अस्तित्वाबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे पालिका निवडणुका झाल्यानंतर गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन होईल, असे ग्रामस्थांना वाटले. महापालिका निवडणुकीपूर्वी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पायघडय़ा टाकून मंत्रालयात स्वागत करणारे मुख्यमंत्री, भाजपचे आमदार, खासदार आता संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीचे काय झाले याकडे ढुंकुनही पाहत नसल्याने समितीच्या ठराविक नेत्यांमध्ये भाजपच्या कार्यप्रणालीविषयी कमालीचा असंतोष पसरला आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपच्या दिवा तसेच आसपासच्या प्रभागांमधील उमेदवारांना अडचणीत आणण्याची ताकद संघर्ष समितीत असल्याचा दावा केला जात आहे. या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी रणनिती आखली जात आहे, असे संघर्ष समितीच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. ठाणे पालिका हद्दीत २२ गावे आहेत. या गावांमध्ये भाजपला अस्मान दाखविण्याची रणनिती आखली जात आहे भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी याबाबत आमचे वरिष्ठ बोलतील, असे सांगत आहेत. गावांचा सर्वागीण विकासासाठी पालिकेतर्फे प्रयत्न होत असून संघर्ष समिती पदाधिकारी जर नाराज असतील  तर मुख्यमंत्र्यांशी पदाधिकाऱ्यांची भेट घालून देण्यात येईल, असे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.