ठाणे : २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाला आजपासून सुरूवात झाली आहे. हे संमेलन २१ एप्रिलपासून ते २३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. संमेलनाच्या उदघाटनापूर्वी ठाण्यातील सावरकर प्रेमी संघटनांच्या वतीने तसेच ठाण्यातील विविध सामाजिक तसेच शैक्षणिक संस्थांनी ग्रंथदिंडी काढली. या दिंडीत ठाणेकर नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थीदेखील ढोल ताशाच्या गजरात सहभागी झाले होते. या दिंडीत सावरकरांचं साहित्य ठेवण्यात आले होते. ठाण्यातील भगवती शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी गडकरी रंगायतन येथे संपली.

ठाण्यात आजपासून सुरु झालेल्या २९ व्या सावरकर साहित्य संमेलनासाठी ठाणे नगरी सज्ज झाली असतानाच दुसरीकडे सावरकरांच्या विचारांवर चालणाऱ्या ठाण्यातील नागरिकांनी स्वातंत्रवीर सावरकर यांनी लिहलेली पुस्तकं तसेच ग्रंथांची पालखी काढली होती. यामध्ये विविध संस्थांचे चित्र रथही सहभागी झाले होते. मुंबईमधील सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा चित्ररथही सहभागी झाला होता. ठाण्यातील नौपाडा परिसरातील भगवती शाळेकडून सुरू झालेली ही दिंडी विष्णूनगर, घंटाळी चौक मार्गे, राम मारुती रोड, तलावपाळी मार्गाने गडकरी रंगायतन येथे येऊन दिडींची सांगता करण्यात आली. ठाण्यात पहिल्यांदाच अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

उद्या शनिवारी २२ एप्रिलला सावरकरांचं साहित्य विश्व यावर डॉ. सदानंद मोरे परिसंवाद कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर रविवार २३ एप्रिल सावरकरांवरील आक्षेप व निराकरण या परिसंवादात डॉ. श्रीरंग गोडबोले सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची सांगता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालक मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.