मुंबईच्या लोकलमध्ये पैसे मागायला येणारे तृतीयपंथी ही मुंबईकरांसाठी नक्कीच नवीन गोष्ट नाही. पैसे मागण्यासाठी त्यांचे मार्ग आणि लोकलही ठरलेल्या असतात. याबरोबरच बाजाराच्या ठिकाणीही तृतीयपंथींना वैतागल्याचा सूर ऐकायला येतो. कधी कधी ते पैसे देण्याचा आग्रह करुन नागरिकांना भंडावून सोडतात. त्यामुळे बऱ्याचदा तृतीयपंथी आणि नागरिकांमध्ये वादावादी झाल्याचेही दिसते. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. यावेळी झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि जास्तीचे पैसे मागितल्याप्रकरणी नागरिकांनी तीन तृतीयपंथींना चांगलाच चोपही दिला. ८ जणांनी मिळून तीन तृतीयपंथींना मारहाण केल्याप्रकरणी पोलीसांनी २ आरोपींना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रुपा शेख, जन्नत शेख आणि अँजल शेख या तिघांना मारहाण करण्यात आली.

हे तिघेही भायंदरमधील बालाजीनगर भागात दिवाळीसाठी पैसे मागायला गेले होते. याठिकाणी दुकानांमध्ये पैशाची मागणी करत असताना एका दुकानमालकाने या तीघांनाही ११ रुपये देऊ केले. मात्र त्यांनी आणखी पैशांची मागणी केली. २१ रुपये द्यावेत यासाठी ते अडून बसले होते. ते देण्यास नकार देत या दुकानदाराने काही लोकांना बोलावून घेतले. हे लोक आल्यावर सगळ्यांनी मिळून मारहाण करण्यास सुरुवात केली असे रुपा याने सांगितले. अशी माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी सांगितले. अशाप्रकारे ज्यांना पैशांची मागणी केली त्या ८ जणांनी मिळून या तिघांना काठ्या आणि रॉडने मारहाण केली. यामध्ये तिघेही जखमी झाले असून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आम्ही त्यांना दिवाळीसाठी जास्ती पैसे द्या इतकेच सांगत होतो. मात्र त्यांनी लगेच मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील २ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाकी ६ जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. तक्रारकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.