मीरा रोड येथे सेफ्टी टँक साफ करत असताना विषारी वायूमुळे गुदमरुन तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. मीरा रोड येथील म्हाडा गार्डनच्या समोर गंगा सोसायटीच्या मागे असलेला सेफ्टी टॅंक साफ करायला हे कामगार उतरले होते. बुधवारी दुपारी ही दुर्देवी घटना घडली. दुपारी दोनच्या सुमारास टँकमध्ये उतरलेले कामगार बाहेर पडले व दुपारच्या जेवणासाठी गेले. त्यावेळी एक कामगार टँकमध्ये सफाईचे काम करत होता. त्या कामगाराला अचानक अस्वस्थ वाटू लागले व तो तिथेच कोसळला. त्याच्या मदतीसाठी म्हणून बाहेर आलेले अन्य दोन कामगार पुन्हा आत उतरले. त्यांचा सुद्धा विषारी वायूमुळे गुदमरुन मृत्यू झाला. मृत कामागारांना बाहेर काढण्यात आले असून पोलीस आणि पालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृत कामगारांची नावे पुढीलप्रमाणे मुझ्फ्फर मोहलीक रफिक मंडल मफिज्युल जखमी कामगाराचे नाव:- अफ्तार मुल्ला