विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून शहापुरातील जोंधळे महाविद्यालयात आजपासून ३० बेड चे करोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटर मध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यात आला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाच जणांचे पथक कार्यरत राहणार आहे. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना आता वेळीच उपचार मिळणार आहेत.

शहापूरसह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजमितीस वासिंद, कसारा, किन्हवली, शहापूर येथील २४ रुग्ण बाधित असून या रुग्णांवर ठाणे, भिवंडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णाला ठाणे, भिवंडी येथे घेऊन जातना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावे, त्यांची हेळसांड होऊ नये या पार्श्वभूमीवर शहापुरातील जोंधळे महाविद्यालयात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

आवश्यक औषधसाठा तसेच एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच जणांचे पथक याठिकाणी कार्यरत रहाणार आहे. या सेंटर मध्ये सध्या ३० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार किमान १०० बेड ची सुविधा करण्यात येणार आहे. या सेंटर साठी जोंधळे महाविद्यालयाने इमारत, खुर्च्या व पाण्याची व्यवस्था केली असून मानसमंदिर संस्थेकडून २० व उल्हासनगर येथील एका व्यापाऱ्याने १० बेड तर निरामय रुग्णालयातर्फे ३० बेड उपलब्ध करून दिले आहेत. तर ५० बेड जिंदाल कंपनी उपलब्ध करून देणार असल्याचे तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी सांगितले. सेंटर व परिसरातील स्वच्छतेचे काम शहापूर नगरपंचायत पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान,  करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना कोरोनाची लागण झालेल्या शहापुरातील दोन मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केली आहे. त्यांच्यावर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपनगराध्यक्ष सुभाष विशे व परिसरातील नागरिकांनी करोना विरोधातली लढाई जिंकणाऱ्या शहापुरातील या दोघांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.