शीळ फाटा येथील भारत मार्केटजवळील खान कम्पाऊंडमधील ३० गोदामांना बुधवारी पहाटे भीषण आग लागून त्यात गोदामांतील प्लास्टिक तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. पाच तासांच्या अवधीनंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलास यश आले असून या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मुंब्रा येथील शीळ फाटा भागातील भारत मार्केटजवळ खान कम्पाऊंड आहे. तीन लाख चौरस फुटांच्या परिसरात ३० गोदामे उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचे साहित्य ठेवण्यात आले आहे. बुधवारी पहाटे ५ वाजता कम्पाऊंडमधील गोदामांना आग लागली. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग पाहून गोदामातील कर्मचाऱ्यांनी कम्पाऊंडबाहेर धाव घेतली. त्यामुळे या घटनेत ते बचावले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. पाच अग्निशमन वाहने, पाच टँकर आणि दोन जम्बो टँकरच्या मदतीने अग्निशमन जवानांनी आग विझविण्यास सुरुवात केली. खाडी आणि विहिरींचे पाणी वापरून ही आग विझविण्यात येत होती. पाच तासांच्या अवधीनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.