शहर निगराणीसाठी महिनाभरात ३१५ कॅमेऱ्यांची उभारणी; मार्चपर्यंत आणखी एक हजार ठिकाणी सीसीटीव्ही

ठाणे : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने तसेच गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ठाणे शहरात येत्या पाच महिन्यांत सुमारे दीड हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सध्या सुमारे २४५ ठिकाणी निगराणीसाठी कॅमेरे बसवण्यात आले असून नोव्हेंबरअखेपर्यंत आणखी ३१५ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर येत्या जानेवारीअखेरीपर्यंत आणखी ६०० ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार असून वायफाय यंत्रणेच्या ठेकेदारांकडूनही येत्या मार्चअखेपर्यंत ४०० कॅमेऱ्यांची उभारणी करण्यात येईल.

ठाणे वाहतूक पोलिसांच्या डिजिटल वाहतूक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन चार वर्षांपुर्वी झाले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पालिका आयुक्त जयस्वाल यांनी नगरसेवक निधीतून १२०० कॅमेरे तर वायफाय योजनेतून ४०० असे एकूण १६०० कॅमेरे बसविण्याची योजना आखली होती. या योजनेच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात २४५ कॅमेरे बसविण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात ३१५ कॅमेरे बसविण्याचे नियोजन  आहे.

शहराच्या विविध भागात कॅमेरे बसविण्यासाठी महापालिका प्रशासन, पोलिस विभाग आणि स्थानिक नगरसेवकांनी जागांची पाहाणी करून त्याप्रमाणे यादी तयार केली आहे. त्यात शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि संवेदनशील ठिकाणे अशा भागांचा समावेश आहे. याठिकाणी  ३१५ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांकरिता खांब उभारणी, विद्युत पुरवठा पुरविणे अशी सर्व कामे जवळपास पूर्ण झाली असून आता केवळ कॅमेरा जोडणी शिल्लक राहिली आहे. नोव्हेंबर महिनाअखेर ही जोडणी करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. नगरसेवक निधीतून आणखी ६०० कॅमेरे बसविण्यात येणार असून ते जानेवारी अखेपर्यंत बसविण्यात येणार आहेत. तर वायफाय योजनेतून बसविण्यात येणारे ४०० कॅमेरे मार्च महिन्यापर्यंत बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात जवळपास १६०० कॅमेऱ्यांचे जाळे उभे राहील.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उपयुक्तता

’ सोनसाखळी चोरांचा माग काढणे.

’ वाहनचोरीच्या घटनांना पायबंद घालणे.

’ संशयास्पद हालचालींवर नजर.

’ विविध रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची तात्काळ माहिती.

’ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई.

निगराणीसाठी नियंत्रण कक्ष

शहरभर बसविण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांच्या जोडणीसाठी स्मार्ट सिटी योजनेतून अदययावत असा नियंत्रण कक्ष उभारण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे. मात्र, हा कक्ष तयार होईपर्यंत हाजुरी येथे तात्पुरत्या स्वरूपात कक्ष तयार करण्यात आला आहे. शहरात आतापर्यंत बसविलेले २४५ कॅमेरे या कक्षाशी जोडण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या आधारे काही गुन्हेगारांना शोधण्यात ठाणे तसेच मुंबई पोलिसांना मदत झाली आहे. तसेच नव्याने बसविण्यात येणारे कॅमेरेही याचठिकाणी जोडण्यात येणार आहेत. हे कॅमेरे अत्याधुनिक स्वरूपाचे असून त्यामुळे रात्रीचे चित्रीकरण स्पष्ट दिसणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.