कारंजे, मियावाकी उद्याने, विद्युत बसेसचा समावेश

वसई:  वसई-विरार शहरातील प्रदूषण दूर करण्यासाठी पालिकेने ३२ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. केंद्र शासनाकडून या योजनेला मंजुरी मिळाली असून या योजनेअंतर्गत शहरात कारंजे, मियावाकी उद्याने, वाहनतळ उभारले जाणार आहे. याशिवाय सीएनजी आणि विद्युत बसेस खरेदी केल्या जाणार असून स्मशानभूमीत विद्युत दाहिन्या बसविल्या जाणार आहे. हवेची गुणवत्ता तपासणारी तसेच हवा शुध्द करणारी यंत्रे शहरात बसवली जाणार आहे.

वसई विरार शहरातील प्रदूषण वाढले असून हवेची गुणवत्ता घसरत चालली होती. हे प्रदूषण कमी करून हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी पालिकेने मेसर्स टंडन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. कंपनीने याबाबतचा कृती आराखडा तयार केला होता. तो आराखडा पालिकेने केंद्र शासनाकडे सुपूर्द केला होता. त्याला मंजूरी मिळाली असून केंद्राकडून पालिकेला १६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.

केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार वसई विरार महापालिकेचा समावेश मिलियन प्लस सिटी या योजनेमध्ये करण्यात आला आहे. हवा गुणवत्तेसाठी या योजनेअंतर्गत महापालिकेला केंद्राकडून १६ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. पुढील कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी नोडल अधिकारी म्हणून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष देहेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी समिती

राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाच्या अंतर्गत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नागरी स्तरावत समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हवा गुणवत्तेची मानके विहित मर्यादेत आणण्यासाठी पालिकेने आठ सदस्यिय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष पालिकेचे आयुक्त आहेत. अन्य सदस्यात पोलीस आयु्क्तालयाचे प्रतिनिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शहर अभियंता, उपप्रादेशिक वाहतूक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, आयआयटीचे स्थापत्य अभियंता, वनस्पतीशास्त्रा व पर्यावरण विज्ञान विभागाचे तज्ञ प्राध्यापक  आदींचा समावेश आहे. आयआयटी आणि निरी यांच्या तज्ञ समितीने सादर केलेल्या मसुदा हस्तक्षेप आणि नागरी योजनांचे पुनरावलोकन करणे, कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या सदस्यांवर आहे.

उपाययोजना

कृती आराखड्या अंतर्गत प्रदूषण रोखण्यासाठी  पर्यावरणस्नेही दोन विद्युत बसेस, १७ सीएनजी बसेस विकत घेतल्या जाणार आहे. विरार येथे पालिका मुख्यालयाजवळ बहुमजली वाहनतळ उभारले जाणार आहे. शहरात चार ठिकाणी मियावाकी पध्दतीने उद्यान साकारले जाणार आहे. शहराच्या चार प्रमुख मध्यवर्ती ठिकाणी कारंजे उभारणे, १६  ठिकाणीहवेचे प्रदूषण नियंत्रण करणारे विंड ऑग्मेंटेशन प्युरिफाईंग युनिट उभारणे, तीन ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणारे यंत्र बसवणे आदींचा समावेश आहे. याशिवाय आठ स्मशानभूनीत विद्युतदाहिनी बसविण्यात येणार आहे.