ठाणे : उल्हासनगर येथील वसार भागात शेजुमल रामनानी या ७० वर्षीय वृद्धाच्या खूनाचा उलगडा करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर पथकाला गुरुवारी यश आले. विठ्ठल दुधेशिया (३२) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. शेजुमल यांनी विठ्ठलला ५ हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे शेजुमल वारंवार मागत असल्याने विठ्ठलने त्यांचा खून केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

वसार येथे १९ जूनला शेजुमल यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्यांचा गळा तारेने आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर पथकाकडून सुरू होता. गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त दीपक देवराज आणि साहाय्यक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या पथकाने या प्रकरणाचा शोध सुरू केला. त्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली. दरम्यान, सीसीटीव्ही आणि माहितीच्या आधारे, यातील आरोपी विठ्ठल हा लालचक्की परिसरातील शेजुमल यांच्या शेजारी राहणारा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी विठ्ठलला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली.

शेजुमल यांच्याकडून विठ्ठलने तीन महिन्यांपूर्वी ५ हजार रुपये उसने घेतले होते, मात्र त्यानंतर विठ्ठल हा शेजुमल यांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. यातून शेजुमल आणि विठ्ठलमध्ये सातत्याने वाद होत असत. अखेर १८ जूनला सकाळी पैसे देतो असे सांगून विठ्ठलने शेजुमल यांना त्याच्या दुचाकीने निर्जनस्थळी नेले. त्यानंतर त्यांचा गळा तारेने आवळून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी विठ्ठलला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.