घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट परिसरातील एका ज्वेलरच्या दुकानात चोरी झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली असून, या घटनेत चोरटय़ांनी सुमारे ३५ लाखांचा ऐवज लुटून नेला आहे. विशेष म्हणजे दुकानातील सीसी टीव्ही कॅमेरेही चोरटय़ांनी लंपास केले आहेत. या घटनेनंतर इमारतीचा सुरक्षारक्षक पसार झाल्याने ही चोरी त्यानेच केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
ठाण्यातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या हिरानंदानी इस्टेट परिसरात लीलाज ज्वेल पॅराडाईज नावाचे ज्वेलरचे दुकान आहे. या दुकानाचे मालक कमलेश जैन असून ते मूळगावी राजस्थानला कामानिमित्ताने गेले आहेत. त्यामुळे त्यांचा नातेवाईक राजकुमार लोढा हा दुकानाचे कामकाज पाहात होता. मंगळवारी रात्री ९.३० वाजता राजकुमार दुकान बंद करून घरी गेला आणि बुधवारी सकाळी पुन्हा दुकान उघडण्यासाठी आला. त्यावेळी दुकानात चोरी झाल्याची बाब त्याच्या लक्षात आली. दुकानाच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीचे ग्रिल कापून चोरटय़ांनी ही चोरी केली. दुकानमालक जैन हे मूळगावी असल्यामुळे आतापर्यंत ३५ लाखांची चोरी झाल्याचा आकडा समोर येत आहे, मात्र त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जैन हे ठाण्यात आल्यानंतर ते स्पष्ट होऊ शकेल, असे सांगण्यात आले. या घटनेप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत चोरटय़ांनी दुकानातील सीसी टीव्ही कॅमेरे आणि तिची यंत्रणा चोरून नेल्याने पोलीसही चक्रावले आहेत. त्यामुळे पोलिसांना चोरटय़ांचा माग काढताना अडथळे येण्याची शक्यता आहे. असे असले तरी, या चोरीच्या घटनेनंतर इमारतीचा सुरक्षारक्षक पसार झाला आहे. त्यामुळे त्यानेच ही चोरी केली असावी, असा संशय आहे.