भाजपचा गौप्यस्फोट; गुन्हे दाखल करण्याची मागणी
वसईत अनधिकृत बांधकामांचे प्रकरण एकामागोमाग एक समोर येत आहे. नालासोपाऱ्याच्या गास येथे तब्बल ३५ बांधकाम व्यावसायिकांनी कागदपत्रांच्या आधारे इमारती बांधल्याचे भाजपने माहितीे अधिकारात उघडकीस आणले आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करून या इमारती तोडण्याची मागणी भाजपने मुख्यमंत्र्यांकडे केलीे आहे.
नालासोपारा येथीेल गास गावातील सव्‍‌र्हे क्रमांक ४११ या आदिवासी आणि बिगर-आदिवासी तसेच आरक्षित जागेवर ३५ विकासकांनी इमारती बांधल्या आहेत. या सर्व इमारती बेकायदा असल्याचा भाजपने आरोप केला आहे. या इमारतींना सिडको अथवा पालिकेची परवानगी नाही. बोगस परवानग्या (सीसी), सातबारा उतारे बोगस बनविण्यात आले आहेत. त्या आधारे दुय्यम निबंधकाकडे नोंदणी करून ग्राहकांना घरे विकली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सही-शिक्का असलेल्या बिनशेती परवानग्या (एनए) बोगस असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. भाजपचे वसई तालुका समन्वयक प्रमुख मनोज पाटील, नालासोपारा उपाध्यक्ष मनोज बोराट व आशीष जोशी यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणलीे आहे. या सर्व बिल्डरांनी बांधलेल्या इमारतींची चौकशी करून त्यांच्यावर एमआरटीपीएम अ‍ॅक्ट तसेच फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केलीे आहे.
पालिका आयुक्तांनी शहरातील सर्व अनधिकृत इमारती तोडण्याचा सपाटा लावला आहे. शहरात दररोज बेकायदेशीर इमारती तोडल्या जात आहे. त्यामुळे या इमारतींबाबत आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.