पालघर जिल्ह्यतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर आढळलेल्या जखमी कासवांना जीवनदान

वसई : पालघर जिल्ह्य़ातील समुद्रकिनारी जखमी अवस्थेत आढळून आलेल्या समुद्री कासवांना वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनने जीवनदान दिले आहे. विविध कारणांस्तव जखमी झालेल्या एकूण ३६ समुद्री कासवांवर उपचार येथील डॉक्टरांनी केले आहे.

पालघर जिल्हा निसर्ग सृष्टीने बहरलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात असणारे कासव हे किनाऱ्यावर वाहून येतात. त्यामुळे किनाऱ्यावर कासव आढळल्याचे प्रमाण हे गेल्या दोन महिन्यांत जास्त असल्याचे दिसून आले आहे. वसई, अर्नाळा, राजोडी, कळंब, भुईगाव, केळवे, डहाणू या समुद्रकिनारी मच्छीमारांना तसेच स्थानिकांना जखमी अवस्थेत समुद्री कासव आढळून आले आहेत. त्यांना वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनमध्ये नागरिकांतर्फे दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांत एकूण ३६ समुद्री कासव आढळून आल्याचे असोसिएशनने सांगितले.

या जखमी कासवांमध्ये विविध आजार आढळून आल्याचे वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनमधील डॉक्टरांनी सांगितले. परजीवी संक्रमण, फ्लोटिंग सिंड्रोम तसेच मासेमारी जाळ्यांमध्ये, नायलॉनच्या दोऱ्यांमध्ये, बोटीच्या मोटारचे पंखे यांना आदळून जखमी झालेले कासव, तर मालवाहू आणि प्रवासी बोटींपासून सांडणाऱ्या तेलामुळे इजा झालेले असे ३६ कासव आढळून आले. डोळय़ांना इजा, श्वसनाचा त्रास अशा प्रकारच्या समस्या या कासवांना होत्या. कासवांवर उपचार पूर्ण झाल्यावर त्यांना समुद्रात सोडण्यात येत असल्याचे डॉक्टर दिनेश व्हिनेरकर यांनी सांगितले.

डहाणू येथील या वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा तुटवडा आहे. यासाठी शासनाने किंवा खासगी संस्थांकडून या सुविधांसाठी मदत मिळावी, जेणेकरून योग्य रीतीने उपचार शक्य होईल अशी मागणी असोसिएशनने केली आहे.