पाणी, भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत आलेल्या प्राणी, सर्प, पक्ष्यांची सुटका

प्रतिकूल हवामानामुळे संकटात सापडलेल्या प्राणी आणि पक्ष्यांच्या मदतीसाठी मुंबई, ठाण्यातील पर्यावरण, वन्य प्रेमी सरसावले असून गेल्या सहा महिन्यात ठाणे आणि आसपासच्या परिसरातून तब्बल १२९ पक्ष्यांचा उष्माघातापासून बचाव करण्यात आला आहे. अतिउष्णतेमुळे जखमी अवस्थेत निपचीत पडलेल्या पक्ष्यांचा शोध घेण्यासाठी पर्यावरणप्रेमी तरुणांची एक मोठी फळी या परिसरात सक्रिय झाली आहे. या मंडळींनी मानवी वस्तीत शिरलेल्या २२२ सापांना तसेच १७ इतर प्राण्यांना पुन्हा जंगलात पाठवले आहे.

‘वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन’ या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या तरुणांनी जानेवारी ते जून या सहा महिन्यात प्राण्यांच्या बचावासाठी मोठी मदत साखळी तयार केली आहे. ठाण्यातील कोकणीपाडा, वसंतविहार, वर्तकनगर, वागळे इस्टेट, कळवा, आनंदनगर या परिसरात फिरून तेथे प्राणी आणि पक्ष्यांचे मोठे बचावकार्य हाती घेण्यात आले आहे यावर्षी उन्हाचे तीव्र चटके बसून पाण्या अभावी अनेक पक्षी जखमी अवस्थेत आढळून आले. यात काईट, बार्न आऊल, कॉपर स्मिथ बारबेट, कॉमन किंगफिशर, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर, वॉटर हेन, नाईट हिरॉन, एशियन कोएल, मैना, बुलबुल, पॅराकिट्स, व्हाईट स्पॉटेड फॅनटेल, टेलर बर्ड, इंडियन पिटा, मॅगपाई रॉबिन, हाऊस स्पॅरो, हाऊस क्रो, रॉक पिजेन अशा जातीच्या पक्ष्यांना उष्णतेची अधिक बाधा झाल्याचे आढळून आले.

याशिवाय उष्णता सहन होत नसल्याने थंड ठिकाण आणि खाद्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरणाऱ्या सापांचे प्रमाणही यंदा मोठे असल्याचे दिसून आले. वेगवेगळ्या जातींच्या २२२ सापांना जंगलस्थळी पोहचवण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. कोब्रा, घोणस, मण्यार, फुरसं, सापडा, पोवळा  नानेटी, कवडय़ा, अजगर, काळतोंडय़ा अशा सापांची नोंद संस्थेकडे करण्यात आली आहे.

उष्णतेची सर्वात जास्त झळ पक्ष्यांना पोहचत असते. पाण्या अभावी अनेकदा पक्षी जखमी अवस्थेत आढळून येतात. हवामान बदलानुसार सापांचे अस्तित्व मानवी वस्तीत आढळते. सापांना उष्णता सहन होत नाही. त्यामुळे मानवी वस्तीतील थंड ठिकाणाच्या शोधात साप आढळतात. पूर्वी सापांना मारण्याचे प्रमाण जास्त होते. अलीकडे नागरिक पर्यावरणाचे भान राखत साप, पक्षी आढळल्यास बचावासाठी संपर्क साधतात.

अनिकेत कदम, वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन