ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात करोनाग्रस्त रुग्णसंख्येने सोमवारी १ हजाराचा आकडा ओलांडला आहे. सोमवारी तब्बल ३८ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे रग्णसंख्या आता १०११ वर पोहचली आहे. आज आणखी एका रुग्णाची करोनासोबतची झुंज अपयशी ठरली आहे, त्यामुळे मृतांचा आकडा १७ वर पोहचला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने १८४१ जणांना होम क्वारंटाइन केलं आहे.

सोमवारी पॉजिटीव्ह अहवाल आलेल्या ३८ रुग्णांपैकी ११ रुग्ण हे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. १० व्यक्ती या अत्यावश्यक सेवेत काम करण्यासाठी घराबाहेर पडत असताना त्यांना लागण झाल्याचं कळतंय, तर उर्वरित व्यक्तींना या विषाणूची लागण कशी झाली याचं कारण समजू शकलेलं नाही. आतापर्यंत ४८८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. अद्याप १४० जणांचा अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या दिवसात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. शहरातील रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयासह उल्हासनगर, डोंबिवली, ठाणे आणि मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.