आयरे गावात केवळ देखावा; प्रभाग अधिकाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा
आयरेगाव, कोपर पूर्व रेल्वे स्थानक, ई प्रभागात सुरू असलेली बेकायदा बांधकामे तातडीने जमीनदोस्त करा, अन्यथा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जा, अशी तंबी आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिली आहे. कारवाईच्या भीतीने ‘ग’ प्रभागातील अधिकाऱ्यांनी इतर प्रभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आयरे, कोपर पूर्व, भोपर पट्टय़ातील बेकायदा बांधकामे तोडण्याची मोहीम बुधवारी दुपारी आयोजित केली होती. या कारवाईत ४० कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईच्या ठिकाणी जाऊन कार्यालयीन वेळ संपेपर्यंत ‘ग’ प्रभागाच्या प्रभाग अधिकाऱ्याने टंगळमंगळ केली आणि कारवाई केल्याचा देखावा उभा करण्यासाठी समोर शेकडो बेकायदा चाळी, गाळे उभे असताना फक्त ४ गाळे तोडून पथक गेल्या पावली परत आले.
कोपर पूर्व, आयरे, भोपर भागांतील खारफुटीचा पट्टा नष्ट करून त्या जमिनींवर बेकायदा चाळी, गाळे उभारण्याचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. खारफुटी खालची जमीन सरकारी. त्यामुळे खूप पैशाची गरज नाही. फक्त या जमिनीवर चाळी, गाळ्यांची बांधकामे करायची आणि ती विकायची एवढेच काम भूमाफिया करतात. झटपट पैसे कमविण्याचे हे एक मोठे साधन भूमाफिया, गावगुंडांना उपलब्ध झाले आहे. पालिका हद्दीत हा सगळा भाग आला आहे. त्यामुळे पालिका अधिकारी भूमाफियांशी संगनमत करून, या अवैध बांधकामांना संरक्षण देत आहेत.
नगरविकास सचिवांकडे तक्रार
आयरे, कोपर पट्टय़ातील खारफुटीचे जंगल भूमाफियांकडून नष्ट केले जात आहे. हे जंगल तोडणाऱ्या माफियांवर कारवाई करा, म्हणून अनेक जागरूक नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांकडून घेतली जात नाही. त्यामुळे एका दक्ष नागरिकाने नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रभाग अधिकारी बेकायदा बांधकामांची पाठराखण करीत असून, आयुक्त या जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फौजफाटा आल्या पावली परत
नगरविकास विभागाकडे तक्रार झाल्याने, ग प्रभाग हद्दीतील आयरे, कोपर पट्टय़ातील बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी फ, ह आणि ग प्रभागाचे कर्मचारी एकत्रित करण्यात आले. फ प्रभागाचे प्रभाग अधिकारी भरत जाधव, ह प्रभागाचे परशुराम कुमावत आणि ग प्रभागाचे मधुकर शिंदे यांच्या सोबत १५ कामगार, २० पोलीस, १ उपअभियंता, १ जेसीबी व ३ वाहनांचा ताफा आयरे गावातील बेकायदा बांधकामांच्या तळावर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता पोहचला. माफियांबरोबर चर्चा, धावपळ यामध्ये दीड तास हेतुपुरस्सर घालविण्यात आला, असे प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात ग प्रभाग अधिकारी शिंदे हळूच तेथून निघून गेले. यामुळे इतर प्रभाग अधिकारी बावचळले. त्यांनी शिंदे यांना ‘आम्हाला सोडून कसे निघून गेलात’ म्हणून जाब विचारला आणि कार्यालयीन वेळ संपत आली तसे फक्त ४ बेकायदा गाळे तोडून पथक माघारी परतले.

कारवाईसाठी भ्रमणध्वनी?
डोंबिवलीतील ‘ई’ आणि ‘ग’ प्रभागातील बेकायदा बांधकामे तोडण्यास टाळाटाळ करणाऱ्या या दोन्ही प्रभागांचे प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे व मधुकर शिंदे यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. समाधानकारक खुलासे न केल्यास या अधिकाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. प्रभाग अधिकाऱ्यांचे, कामगारांचे नेहमीच रक्षण करणाऱ्या पालिका मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काल गुपचूप प्रभाग अधिकाऱ्यांना बेकायदा बांधकामे तोडून टाका, असा भ्रमणध्वनी केला होता, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.