कल्याण : मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात नवी मुंबईचा अपवाद वगळता इतर शहरांमधील करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. याच वेळी कल्याण-डोंबिवलीत हा आकडा नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी महापालिका हद्दीत १९६ बाधित सापडले होते. बुधवारी हा आकडा पुन्हा ४००च्या घरात पोहचला.

राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून बुधवारी कल्याण- डोंबिवलीतील रुग्णांचा आकडा ३८६ होता. मंगळवारी १९२ बाधितांची नोंद झाली होती. नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, मुंब्रा, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील रुग्ण संख्या, मृत्यूदर कमी झाले आहेत. असे असताना कल्याण -डोंबिवली परिसरात रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. आजवर पालिका हद्दीत रुग्णांची संख्या २६ हजार झाली आहे. इतर शहरांच्या तुलनेत कल्याण- डोंबिवलीतील रुग्णांचा आकडा अधिक आहे. ठाणे, भिवंडी, उल्हासनगर यासारख्या अतिसंक्रमित क्षेत्रातील रुग्णांचा आकडा नियंत्रणात येत असतानाही कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये अजूनही रुग्णसंख्या वाढत आहे. येथील करोना नियंत्रण मोहीम तसेच इतर आरोग्य व्यवस्थेच्या आघाडीवर देखील रहिवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंबंधी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

शास्त्रीनगर रुग्णालयात खाटांची वानवा

डोंबिवलीत पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात करोना रुग्णांना उपचारासाठी खाटा उपलब्ध नसल्याचे उत्तर  दिले जात आहे. त्यामुळे बाधितांना खासगी रुग्णालयांमधील महागडय़ा उपचारांचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. शास्त्रीनगर रुग्णालयात चौकशीसाठी रुग्ण गेल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखवला जात आहे.  पालिका प्रशासनाकडून खाटांची माहिती मिळविण्यासाठी नियंत्रण कक्षात संपर्क करण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना  रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्यास तेथील प्रशासन नकार देत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. लालबावटा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कॉ. काळू कोमास्कर यांच्या एका परिचिताला उपचार घेण्यासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले. त्याऐवजी  खासगी साई रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. साई रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णाकडून तेथे ५० हजार रुपयांची अनामत रक्कम घेण्यात आली. एक ते दीड दिवसाचे साई रुग्णालयाने ४६ हजार रुपये आकारण्यात आले.