कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने बालकांसाठी तीन दिवसीय उन्हाळी प्रशिक्षण शिबीर डोंबिवलीतील आनंद बालभवन येथे सकाळी ११ ते १ आणि दुपारी ५ ते ७ या वेळेत झाले. या शिबिरात ५ ते १२ वयोगटातील सुमारे ३०० ते ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
या शिबिरात अर्णव एन्टरटेन्मेंट आणि मीडियाच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना ग्रीटिंग कार्ड, पॉट पेंटिंग, रांगोळी, वॉल हॅंगिंग, ग्लास पेंटिंग, नेल आर्ट, फ्लॉवर मेकिंग, चित्रकला, पेन स्टॅण्ड, पपेट्स, पेपर बॅग, स्टॅण्ड पेंटिंग, कला आदि वस्तू बनविण्यास शिकविले. याबरोबर नृत्य व योगाचे  प्रशिक्षण वर्गही यावेळी घेण्यात आले. डोंबिवली तसेच मुंबईतील अनेक विद्यार्थी या शिबिरात सहभाही झाले होते. शिबिरातील छंदांचे वैविध्य लक्षात घेऊन मुलांना सलग तीन दिवस आम्ही येथे आणले होते, अशी प्रतिक्रिया पालक जान्हवी नांदगावकर आणि संगीता गाडगीळ यांनी दिली. मुलांनी या शिबिरात दिवसभरात तयार केलेल्या वस्तू बनविण्याचा सराव घरीही केला.
महिला बालकल्याण समितीच्या सभापती कोमल पाटील म्हणाल्या, उन्हाळी सुट्टय़ा सुरू असल्याने आनंद बालभवन मुलांसाठी काही कार्यक्रम करण्याचा विचार केला आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबीर भरविण्यात आले. दुपारच्या वेळेत घरी जाण्यास काही मुले तयारच नव्हती. यावरूनच मुलांना हे शिबीर आवडले असल्याची खात्री पटते. यापुढेही मुलांसाठी सुंदर हस्ताक्षर, कॅलिग्राफी यांसारखे वर्षभर काही उपक्रम राबविता येतील का याचा विचार करत आहोत. त्यासाठी लवकरच आराखडा तयार केला जाईल, असे आयोजकांनी सांगितले.यावेळी खुशी देढिया, मल्हार सावंत, यश सोनावणे, हिमांशु पाटील आदी विद्यार्थ्यांना उत्तम कला सादर केल्याने गौरविण्यात आले, तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मंदा पाटील, कोमल निग्रे, रेखा जाधव, प्रतिमा जाधव, भारती कुमरे, दर्शना म्हात्रे, लक्ष्मी बोरकर, महापालिकेचे प्रकाश ढोले, गजानन कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.