४८ अनुदानित शाळांमधील प्राथमिक शिक्षकांना तातडीने हजर होण्याचे आदेश

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने शासकीय अनुदानित ४८ शाळांमधील ४०० शिक्षकांना करोना विषाणू प्रतिबंध सव्रेक्षण कामासाठी बुधवारपासून नियुक्त केले आहे. पालिका हद्दीतील १५ आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून शिक्षकांनी तेथील वैद्यकीय पथकासोबत काम करायचे आहे. नियुक्त शिक्षकांनी तातडीने कामाच्या ठिकाणी हजर होऊन काम सुरू करायचे आहे. जे शिक्षक हजर होण्यात टाळाटाळ करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी तंबी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका हद्दीतील विविध भागांतील रहिवाशांचे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आजारांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. प्रशासनाने गेल्या दीड महिन्यापासून सुमारे ३०० हून अधिक पालिका कर्मचारी सर्वेक्षण कामासाठी तैनात केले आहेत. ती कामे सुरू असतानाच अधिकाधिक रहिवाशांची आरोग्य तपासणी व्हावी या विचारातून प्रशासनाने सर्वेक्षण कामासाठी खासगी अनुदानित शाळांमधील प्राथमिक शिक्षकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक आलेल्या या आदेशाने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  आमचे आरोग्य धोक्यात घालून ही कामे आम्ही का करावीत. पालिकेत साडेसहा हजार कर्मचारी काम करीत आहेत. त्यामधील कर्मचारी या कामासाठी प्रशासनाने नियुक्त करावे. आरोग्याचे सव्रेक्षण म्हणजे जनगणना नाही. तिथे वैद्यकीय ज्ञान असलेला कर्मचारी पाहिजे, असे नियुक्त केलेल्या महिला शिक्षकांनी सांगितले.

शिक्षकांच्या नेमणुका करताना ठोस नियोजन करण्याची आवश्यकता होती. शिक्षक सर्वेक्षण कामाला नकार देणार नाहीत. नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण अधिक आहे. कल्याण निवासी शिक्षिकेला कल्याण परिसरात आणि डोंबिवली निवासी शिक्षिकेला डोंबिवली आरोग्य केंद्र भागात नियुक्त्या देण्यात येणे आवश्यक होते. आदेश काढताना शिक्षक प्रवास कसा करणार याचा विचार करण्यात आलेला नाही.

– अनिल बोरनारे, संयोजक, भाजप शिक्षक संघ, मुंबई-कोकण आघाडी