भाईंदर : मीरा-भाईंदरमध्ये बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्याआरोग्य विभागातील सुमारे ४०१ कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. यात आजवर एका डॉक्टरसह  आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली आहे.

करोनाकाळात आरोग्य विभागासह विविध विभागांतील कर्मचारी बाधित झाले आहेत. ही संख्या सतत वाढतच आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांसह अधिकारी, अभियंते, विविध विभागातील कर्मचारी, शिपाई यांनाही करोनाशी संबंधित कामे देण्यात आली आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयातील कर्मचारीही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

शहरात आजवर १८ हजार ७५ नागरिकांना बाधा झाली आहे.  ५५७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा स्थितीत संक्रमण रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या ४०१ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यात ९० डॉक्टर, ११५ परिचारिका आणि १९६ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याच वेळी यातील ९० टक्के कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. यातील काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी दिली.

आजवरची स्थिती

*  डॉक्टर         —   ९०

* परिचारिका   —  ११५

* इतर             —  १९६

* मृत्यू            —     ०२