सात महिन्यांमध्ये एकही करोनाबाधित नाही; मुरबाड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचा समावेश

ठाणे : जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागांमध्ये असलेल्या ४५ ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये गेल्या सात महिन्यांमध्ये एकही करोना रुग्ण आढळून आलेला नसल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक २५, शहापूरमधील १६, अंबरनाथमधील ३ आणि भिवंडीतील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. कल्याण तालुक्यातील मात्र सर्वच ग्रामपंचायतींमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये एकूण ४३० ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्य़ात मार्च महिन्याच्या अखेरीपासून करोनाचा शिरकाव होण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या काळात जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग करोनापासून सुरक्षित असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासामुळे आणि टाळेबंदीत शिथिलीकरणानंतर ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव झाला होता. ग्रामीण भागातील ४३० ग्रामपंचायतींपैकी ३८५ ग्रामपंचायतींमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याचे आढळून आले. त्यात कल्याण तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे. तसेच सुरुवातीपासूनच ठाणे जिल्हा परिषदतर्फे ग्रामीण भागात सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या भागात रुग्ण आढळणारी ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय कर्मचारी आणि जिल्हा परिषद शाळा शिक्षक यांच्या मदतीने आरोग्य सर्वेक्षणावर आणि करोना जनजागृतीवर भर दिला जात आहे.

करोना जनजागृतीचा मोठा फायदा जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागांमध्ये दिसून आला. त्यामुळे जिल्ह्य़ातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये गेल्या सात महिन्यांपासून करोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याची बाब समोर आली आहे. या ग्रामपंचायत प्रशासनाने आणि गावकऱ्यांनी करोना रोखण्यासाठी वेळोवेळी हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, बाहेर पडताना मुखपट्टीचा वापर करणे या नियमांचे काटेकोर पालन केले असून यामुळेच या ग्रामपंचायतीत करोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

म्हसा गावातही करोनाचा शिरकाव नाही

मुरबाड तालुक्यातील म्हसा हे ग्रामीण भागातील बाजाराचे प्रमुख केंद्र आहे. महामार्गाला लागून असलेल्या या गावामधून कर्जत, मुरबाड आणि धसई या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते आहेत. या गावात वाहतुकीची साधने आणि बाजार असल्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, करोना काळात येथील ग्रामपंचायत आणि नागरिकांनी विशेष काळजी घेतल्यामुळे गेल्या सात महिन्यांमध्ये या गावात करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

सुरक्षित ग्रामपंचायती

तालुके             ग्रामपंचायती       करोनापासून सुरक्षित ग्रामपंचायती

मुरबाड             १२६                 २५

शहापूर              ११०                 १६

अंबरनाथ            २८                 ३

भिवंडी              १२०                 १

कल्याण             ४६                  ०

एकूण               ४३०                ४५