ठाणे : आरोग्य यंत्रणांकडून परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. मात्र, परदेशातून आलेले अनेक नागरिक पथकाच्या नजरेतून सुटत असून अशा नागरिकांची माहिती देण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनी खणखणत आहेत. त्यामुळे पोलिसांप्रमाणेच आता आरोग्य विभागाच्या पथकावर रुग्णांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. अशाच प्रकारे मंगळवारी दिवसभरात ४५ जणांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एका संशयित रुग्णाला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा आणि महापालिका आरोग्य पथकाकडून संबंधितांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी केली जात आहे. याशिवाय, या पथकाकडून १४ दिवस संबंधितांच्याघरी जाऊन प्रवाशांमध्ये करोनाची लक्षणे दिसून येतात का याची पाहाणी केली जात आहे. असे असले तरी परदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे अनेक प्रवासी पथकाच्या नजरेतून सुटत असून या प्रवाशांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असते. त्यामुळे अशा प्रवाशांची माहिती आता नागरिकांकडून पालिका प्रशासनाला दिली जात असून मंगळवारी दिवसभरात अशाप्रकारची माहिती देणारे ४५ दूरध्वनी पालिका आरोग्य विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना आले. त्याआधारे आरोग्य विभागाच्या पथकाने त्या ४५ नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली. त्यापैकी एका संशयित नागरिकाला मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा संशयित रुग्ण परदेशात प्रवास करून आलेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

‘परदेशातून येणारे काही नागरिक स्वत:हून तर काहींचे नातेवाईक आरोग्य विभागाला माहिती देत आहेत. तर काही नागरिकही परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती देत आहेत,’ असे पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले.

किरकोळ तक्रारी ऑनलाइनकरा! ठाणे पोलिसांचे नागरिकांना आवाहन

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य शासनाकडून केले जात असतानाच पोलीस ठाणे आणि मुख्यालयात तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता ई-मेलद्वारेच तक्रारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा अत्यंत गरज असेल तर नागरिकांनी पोलीस ठाण्यात किंवा मुख्यालयात यावे, अन्यथा ई-मेलद्वारेच तक्रारी कराव्यात, असे आवाहन ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय येनपुरे यांनी केले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे ते बदलापूर या शहरात एकूण ३५ पोलीस ठाणी आहेत. सर्वच पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क पुरविण्यात आले आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ठाणे पोलिसांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तर आयुक्तालयात येणाऱ्या नागरिकांचे सॅनिटायझरने हात धुतल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांच्या संपर्कात आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाने हा निर्णय घेतला आहे. ‘नागरिकांनीही किरकोळ तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्याऐवजी पोलिसांच्या ई-मेलवर किंवा नियंत्रण कक्षात कळवाव्यात. तसेच पोलीस ठाण्यात गर्दी टाळावी,’ असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी केले आहे.