News Flash

ठाण्यात साडेचार हजार धोकादायक इमारती

अतिधोकादायक इमारतींच्या संख्येत घट

अतिधोकादायक इमारतींच्या संख्येत घट

ठाणे : पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने यंदाही शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये शहरात एकूण साडेचार हजार धोकादायक इमारती आहेत. त्यात ७३ अतिधोकादायक इमारती असून गेल्या वर्षी अशा इमारतींची संख्या १०३ होती. नौपाडा-कोपरी परिसरात सर्वाधिक अतिधोकादायक इमारती आहेत, तर वर्तकनगर आणि वागळे इस्टेट भागात एकही इमारत धोकादायक नसल्याचे समोर आले आहे.

ठाणे, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा या भागांत मोठय़ा प्रमाणात बेकायदा इमारती आहेत. अशा इमारती पावसाळ्यात कोसळून त्यामध्ये जीवितहानी झाल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. तसेच नौपाडय़ातील जुन्या अधिकृत इमारतीही मोडकळीस आल्या आहेत. अशा इमारतीही कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी तयार करते. त्यामध्ये धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ए , सी२बी आणि सी३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण करण्यात येते. यंदाही महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. या यादीनुसार शहरात ४ हजार ५२२ इमारती धोकादायक असल्याची बाब पुढे आली आहे. गेल्या वर्षी शहरात ४ हजार ५०७ धोकादायक इमारती होत्या. त्यामुळे यंदा धोकादायक इमारतींच्या संख्येत १५ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील ४ हजार ५२२ पैकी ७३ इमारती धोकादायक असून येथील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्या आहेत. काही वर्षांपूर्वी कळवा परिसर अतिधोकादायक इमारतींच्या यादीमध्ये सर्वात आघाडीवर होता. मात्र यंदा त्या ठिकाणी एकही धोकादायक इमारत नसल्याचे यादीतून दिसून येते. तर शहराच्या मध्यवर्ती भागातील नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच ४३ धोकादायक इमारती आहेत. नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदरमध्ये केवळ एक इमारत धोकादायक आहे, तर वर्तकनगर भागात एकही इमारत धोकादायक नाही. सर्वात दाटीवाटीचा परिसर आणि अनधिकृत इमारती असलेल्या लोकमान्य-सावरकरमध्ये सात, उथळसरमध्ये सहा, कळव्यामध्ये पाच, मुंब्य्रामध्ये सहा आणि दिव्यामध्ये पाच इमारती अतिधोकादायक आहेत. असे असले तरी मुंब्रा, वागळे इस्टेट आणि दिवा भागांत धोकादायक इमारतींची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते.

ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात आली आहे. यातील अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. या इमारती नागरिकांनी रिकाम्या केल्यानंतर त्या पाडण्याची कारवाई सुरू करण्यात येईल.

अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका

 

धोकादायक इमारती

प्रभाग समिती         इमारती

नौपाडा-कोपरी          ४५३

उथळसर              १३४

वागळे इस्टेट          १०८६

लोकमान्य-सावरकर      २१७

वर्तकनगर             ५४

माजिवाडा-मानपाडा       १२५

कळवा               १९३

मुंब्रा                 १४१९

दिवा                ८४१

एकूण                ४५२२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 2:49 am

Web Title: 4500 dangerous buildings in thane zws 70
Next Stories
1 तीन वर्षीय मुलासमोर पत्नीची निर्घृण हत्या
2 भाईंदरमधील कॅनरा बँकेला आग
3 सफाई विभागात वाहन भ्रष्टाचार?
Just Now!
X