मिरा- भाईंदर महानगरपालिकेच्या ९५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी रविवारी ४६.९३ टक्के मतदान झाले. दिवसभर पाऊस कोसळत असतानाही गेल्या निवडणुकीएवढेच मतदान या वेळीही झाले. पाऊस नसता तर या वेळी मतदान पन्नास टक्क्यांच्या वर गेले असते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

रविवारी सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात झाली; परंतु सकाळपासून पडणाऱ्या पावसाने सकाळच्या सत्रात मतदारांनी घरी बसणे पसंत केले. पावसामुळे मतदानाची टक्केवारी घसरणार असल्याचे उमेदवारांच्या लक्षात आल्याने त्यांची एकच धावपळ उडाली. अनेक उमेदवारांनी मतदारांसाठी वाहनांची सुविधा उपलब्ध करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. कार्यकर्तेही मतदार बाहेर काढण्यासाठी मेहनत घेऊ लागल्याने परिस्थितीत सुधारणा झाली आणि सकाळी अकरानंतर मतदार पावसातही बाहेर पडू लागल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातही मतदार मतदानासाठी बाहेर पडत होते. सर्वाधिक मतदान उत्तन प्रभागात ६३ टक्के इतके झाले, तर सर्वात कमी मतदान मिरा रोडच्या नयानगर येथील प्रभाग २२ मध्ये सुमारे ३५.३८ टक्के इतके झाले. मुर्धा, राई या प्रभागांतही ६० टक्के इतके मतदान झाले. उर्वरित सर्व मतदान केंद्रांवर सुमारे ५० टक्के मतदान झाले. मात्र ९, २२ आणि १८ प्रभागांत कमी मतदान झाल्याने मतदानाची सरासरी घसरली. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपले तेव्हा एकंदर ४६.९३ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी ४६.९९ इतके मतदान झाले होते.

  • काही मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. प्रभाग आठमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी लोकही मोठय़ा संख्येने जमा झाले. त्यामुळे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने इतरत्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
  • शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीदेखील करण्यात येत होत्या. मिरा रोड येथे एक महिला मतदान करून आल्यानंतर कपडे धूत असताना बोटाची शाई पुसली गेल्याचे तिच्या लक्षात आले. आणखी काही ठिकाणीदेखील अशाच तक्रारी ऐकायला मिळाल्या.
  • बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारीदेखील अनेक ठिकाणी करण्यात आल्या.

मेहता यांच्याविरूध्द तक्रार

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या निकटवर्तीयाच्या शाळेतही मतदान केंद्र होते. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मेहता मतदान केंद्रात आले होते, अशी तक्रार शिवसेनेने केली. मात्र, मेहता यांनी त्याचा इन्कार केला.