तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ४७२ टनांचा अतिज्वलनशील सॉल्व्हन्टचा बेकायदेशीर साठा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला. अनेक उद्योगांकडून अशा प्रकारे घातक व ज्वलनशील रसायनांचा अवैध साठा केला जात असल्याने परिसरातील नागरिकांसाठी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जी.एस.पी. एन्टरप्राईजेस कंपनीच्या आवारातून रात्रीच्या वेळी रसायनाचे ड्रम बाहेर काढले जातात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.  या कंपनीवर छापा टाकल्यानंतर कंपनीच्या आवारात तीन हजार १२० रसायनाने भरलेले ड्रम ठेवल्याचे आढळून आले. यामध्ये रासायनिक सॉल्व्हन्ट हे द्रव्य असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापन प्रतिनिधीने सांगितले. या ड्रमपैकी काहीमधून ज्वलनशील पदार्थाची गळती होत असल्याचे आढळून आले. आगीची एखादी ठिणगी जरी या पदार्थाच्या संपर्कात आल्यास मोठी दुर्घटना होण्याचा धोका असतानाही कोणतीही सुरक्षा व्यवस्था येथे केली गेली नसल्याचे निदर्शनास आले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ड्रममधील रसायनाची तपासणी केल्यानंतर या उद्योगाला बंद करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे कंपनीच्या मालकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या ठिकाणी फार्मा क्षेत्रातील काही नामांकित उद्योगांकडील घातक कचरा (स्पेन्ट सॉल्व्हन्ट) आढळल्याने तारापूरच्या अशा काही उद्योगांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मधुकर लाड यांनी दिली.

बेकायदा साठा

जी.एस.पी. एन्टरप्राईजेस कंपनीच्या नावावर येथे प्लॉट असून एमआयडीसीसोबत त्रिपक्षीय लीज करार करताना त्या ठिकाणी ‘फार्मा’ उद्योग स्थापन करण्याचा उल्लेख आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उद्योग स्थापित करण्यासाठी घेतलेल्या परवानगीमध्ये (कन्सेन्ट टू एस्टाब्लिश) या ठिकाणी रंग व पिगमेन्टचे पॅकिंग व  रिपॅरींग असा उल्लेख करण्यात आला होता. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रासायनिक उत्पादन होत नसल्याच्या कारणावरून ही कंपनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (फॅक्टरी इन्स्पेक्टर) यांच्या ससेमिऱ्यातून निसटण्यात यशस्वी झाली होती. मात्र टाकलेल्या धाडीतून येथे बेकायदा रासायनांचा साठा केला जात असल्याचे उघडकीस आल्याने इतर कंपन्यांबाबतही संशय निर्माण होत आहे.