संख्या १६१ वर; दाटीवाटीच्या परिसरात निर्बंध कायम

ठाणे : महापालिका क्षेत्रात आठ दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या ११३ प्रतिबंधित क्षेत्रांत नव्या ४८ परिसरांची भर पडली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता १६१ इतकी झाली आहे. त्यात ८८ इमारती, तर उर्वरित चाळी आणि झोपडपट्टी परिसराचा समावेश आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र संख्येत भर पडत असल्याचे चित्र आहे. याच वेळी ६६ प्रतिबंधित क्षेत्रांचे निर्बंध हटविण्यात आले आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

संक्रमित रुग्णांची संख्या साडेसातशेच्या पुढे गेली आहे. रोज रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. वागळे इस्टेट आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्र रुग्ण संख्येत आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या भागातील करोना संक्रमण रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे राहिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दाटीवाटीचा परिसर असलेले हे परिसर अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अन्य उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात रुग्ण आढळून आलेल्या इमारती, चाळी, झोपडपट्टीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो.

मुंब्रा, वागळे इस्टेट, कळवा आघाडीवर

मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रांत प्रत्येकी २६, सावरकर-लोकमान्यनगर प्रभाग समिती क्षेत्रात २१, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात २०, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात १७ प्रतिबंधित क्षेत्रे असून, हे सर्वच परिसर महापालिकेने जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीत आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

प्रतिबंधित क्षेत्र                   इमारत संख्या

उथळसर                                   ८

माजिवाडा-मानपाडा                  ६

वर्तकनगर                                 ५

सावरकर-लोकमान्य                 ६

वागळे इस्टेट                            १६

नौपाडा-कोपरी                         १०

कळवा                                    १३

मुंब्रा                                      १८

दिवा                                      ६

एकूण                                  ८८