शहरातील ४८ महिलांना रिक्षाचालक परवाने
वसई-विरार शहरात यापुढे महिला रिक्षाचालकांची संख्या वाढणार आहे. वसईच्या प्रादेशिक परिवहन विभागाने सोमवारपासून दीड हजार परवाने जाहीर झालेल्यांना चाचणी घेऊन परवाने वाटप देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ४८ महिलांचा समावेश आहे. वसईच्या चुळणे गावातील सिसल कोलासो या परमिटधारक महिला ठरल्या आहेत.
राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात मुंबई महानगर क्षेत्रासाठी ३५ हजार रिक्षा परवान्यांची सोडत काढली होती. वसई-विरारसाठी १५३४ जणांचा समावेश होता. त्या सर्वाची सोमवारपासून चाचणी सुरू झाली आहे. विरारच्या चंदनसार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विजेत्या उमेदवारांची मराठीची चाचणी सुरू आहे.
यासाठी उमेदवारांना मराठी भाषा येते का ते तपासले जात आहे. या चाचणीचे चलचित्रण केले जात आहे. दररोज दीडशे उमेदवार याप्रमाणे या मुलाखती होत आहेत. पात्र ठरलेल्या उमेदवारांना परमिटचे वाटप करण्यात येणार आहे. वसईच्या चुळणे गावात राहणाऱ्या सिसिल कोलासो या परमिट मिळविणाऱ्या या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
उपप्रादेशिक परिवहन उपायुक्त अभय देशपांडे यांच्या हस्ते त्यांना परवाना देण्यात आला. ५ मार्चपर्यंत ही प्रकिया चालणार आहे. यापूर्वी वसईत अनिता कुडतडकर या एकमेव रिक्षाचालक महिला होत्या.