अग्निशमन दलाच्या ५ जवानांसह सात जण अत्यवस्थ

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागासाठी आणलेल्या क्लोरीन सिलिंडरमधून अचानक गळती होऊ लागल्याने शेकडो रहिवाशांच्या जीवाला गुरुवारी धोका निर्माण झाला होता. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत क्लोरिन सिलेंडर तातडीने खाडीत विसर्जित केल्याने होणारी संभाव्य दुर्घटना टळली आहे. परंतु यावेळी अग्निशमन दलाच्या ५ जवानांसह इतर सात जण अत्यवस्थ झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची पाण्याची टाकी भाईंदर पश्चिम येथे ६० फुटी रस्त्यावर आहे. या टाकीत साठविण्यात येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी टाकीखालीच क्लोरीन वायूचा सिलेंडर ठेवण्यात आला आहे. याच ठिकाणी अग्निशमन दलाचे कार्यालयदेखील आहे. गुरुवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास क्लोरीन सिलेंडरमधून गळती होऊ लागली. या वायुगळतीमुळे रात्रपाळीवरील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना तसेच आसपासच्या रहिवाशांना त्रास होऊ लागला.

क्लोरीन वायू विषारी असल्याने आसपासच्या शेकडो रहिवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात याची जाणीव झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत गळती थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु गळती थांबत नसल्याचे लक्षात आल्याने तातडीने परिसरातल्या पाच इमारती रिकाम्या करण्यात आल्या तसेच क्लोरीनचा सिलिंडर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. जीवाची पर्वा न करता अग्निशमन दलाच्या जवानांनी गळका सिलिंडर भाईंदर पश्चिम येथील खाडीत विसर्जित केला. यावेळी क्लोरीन वायूची बाधा होऊन ५ जवान, पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांना श्वासोच्छ्वासास त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील ३ जवानांना महापालिकेच्या टेंभा येथील रुग्णालयात सुरुवातीला नेण्यात आले. यातील एका जवानाची तब्येत अधिकच ढासळली होती. सर्वाच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. शनिवारी या सर्वाना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

सिलिंडर निकृष्ट दर्जाचा

क्लोरीन वायूचा सिलिंडर कंत्राटदाराच्या माध्यमातून दर महिन्याला बदलण्यात येतो. परंतु यावेळी देण्यात आलेला सिलिंडर निकृष्ट दर्जाचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच यातून वायु गळती होऊ लागली. शिवाय हा सिलिंडर टाकीखाली उघडय़ावरच ठेवण्यात येत असून त्याच्या सुरक्षेसाठी कोणतीही यंत्रणा तैनात केली नसल्याचे तसेच सिलेंडरमधून गळती होऊ लागल्यास कोणते उपाययोजना करायची याचे प्रशिक्षणही येथील कर्मचाऱ्यांना नसल्याचे उघड झाले आहे. भाईंदर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून प्राथमिक चौकशीत पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा यात असल्याचे दिसून येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.