बदलापूर शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच शहराने करोना बाधित रुग्णांच्या संख्येची शंभरी गाठली होती. बुधवारी आणखी ५ नवीन रुग्णांची भर पडलेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या ५ रुग्णांपैकी ४ रुग्ण हे याआधी करोना बाधित व्यक्तीच्या कुटुबांतील आहेत. हे चारही रुग्ण बदलापूर पश्चिम भागातील सानेवाडी परिसरात राहणारे आहेत तर उर्वरित एक व्यक्ती हेंद्रेपाडा भागातला रहिवासी आहे.

बुधवारी आढळलेल्या ५ नवीन रुग्णांसह बदलापूरमधील रुग्णसंख्या १२४ वर पोहचलेली आहे. आतापर्यंत दोन व्यक्तींना करोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले असून ८२ जणांवर उपचार सुरु आहेत. ४० रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. शहरातील करोना बाधित रुग्णांवर ठाणे, उल्हासनगर, मुंबई येथील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शहरातील महत्वाचे ४१ रहिवासी भाग प्रतिबंधित केले आहेत.